पोलिस वाहनात जाऊन कस्टडी अन् शासकीय वाहनातून विदाई. कथा एका अनोख्या प्रेमकहाणीची

दत्ता देशमुख
Saturday, 16 May 2020

धारूर तालुक्यातील एका गावातील भावकीतील दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमवीरांनी डिसेंबर २०१७ ला गावातून धूम ठोकली. पण, मुलगी अल्पवयीन असल्याने मुलावर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. दोघे पुण्यात राहू लागले.

बीड - ज्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद झाल्याने पोलिस जीपमध्ये जाऊन कस्टडीत राहावे लागले; पण दोघेही एकमेकांशीच लग्न करण्यावर ठाम होते. अखेर तिच्याशीच आयुष्याच्या रेशीमगाठीही जुळल्या आणि या दांपत्याची फुलांनी सजविलेल्या शासकीय वाहनातून विदाई झाली. कन्यादान करणारे, मामा आणि भंतेही सर्व शासकीय अधिकारीच होते. या अनोख्या खडतर प्रेमकहाणीचा आनंदमय प्रवास शनिवारी शासकीय इतमामात पार पडलेल्या विवाहात झाला. 

घडला प्रकार असा : धारूर तालुक्यातील एका गावातील भावकीतील दोघांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमवीरांनी डिसेंबर २०१७ ला गावातून धूम ठोकली. पण, मुलगी अल्पवयीन असल्याने मुलावर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. दोघे पुण्यात राहू लागले. मुलगा कंपनीत कामाला तर मुलगी घरी असे. २०१८ ला या मुलीने एका मुलीला जन्म दिला.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

अपहरणाचा गुन्हा नोंद असल्याने पोलिसांनी तपास करून अल्पवयीन असल्याने या मुलावर अपहरणाचा गुन्हा असल्याने पोलिसांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये या दोघांना शोधून आणले. त्यानंतर या मुलावर अत्याचारासह पोस्को (मुलगी अल्पवयीन असल्याने) कलम लागले. त्यामुळे त्याला कोठडीत तर मुलीला शासकीय सुधारगृहात पाठविले. मुलगी त्याच्यासोबतच लग्नावर ठाम होती; परंतु अल्पवयीन असल्याने तिच्या म्हणण्याला अर्थ नव्हता. अखेर ती सज्ञान झाल्यानंतर न्यायालयाने तिचे म्हणणे ऐकले आणि दोघांच्या लग्नाचा निवाडा दिला. 

हेही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन  

येथील सामाजिक न्याय भवनात शनिवारी या दोघांचा विवाह ठरला. सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, महिला व बालविकास अधिकारी आर. डी. कुलकर्णी मुलीचे मामा झाले. तर, समाजकल्याण अधिकारी राजू एडके व वित्त व लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे मुलाचे मामा झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे भंते बनले आणि वऱ्हाडी म्हणून तत्त्वशील कांबळे व अशोक तांगडे. फिजिकल डिस्टन्स पाळून हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांची विदाई फुलांनी सजविलेल्या शासकीय वाहनातून झाली. 

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

चिमुकलीच्या हितासाठी... 
मुलगी चिमुकलीसोबत सुधारगृहात राहत होती, तर मुलगा कोठडीत होता. मात्र, सज्ञान झाल्यानंतर सुनावणीत दोघांनीही एकमेकांसोबत लग्नाची तयारी दाखविली. या चिमुकलीच्या भविष्याच्या हिताच्या दृष्टीने दोघे एकत्र राहणे गरजेचे आहे असे न्यायालयाला वाटले आणि त्यामुळे दोघांची संमती दिली. त्याच्यावरील गुन्ह्याबाबत पुढील निर्णयासाठी या विवाहाचा कायदेशीर सोपस्कार सादर केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go to the police vehicle and say goodbye to the custody vehicle