परभणीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

-महसूल विभागाने आर्थिक मदत देण्याचे काढले आदेश 
- ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये क्यार आणि महा चक्रीवादळामुळे झाली होती अतिवृष्टी 
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान 

परभणी : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत देण्यासाठी आकस्मिकता निधीतून परभणी जिल्ह्याला १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपये मंजूर झाले आहेत. महसूल विभागाने याबाबतचे आदेश शुक्रवारी (ता.१३ डिसेंबर २०१९) काढले आहेत. यापूर्वी ८७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये क्यार आणि महा चक्रीवादळामुळे राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्यातील ३४९ तालुक्यांमधील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मदतनिधी जाहीर केला आहे. याआधी १९ नोव्हेंबर रोजी २५ टक्के निधी वितरित करण्यात आला होता. त्यामध्ये परभणी जिल्ह्याला ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये मिळाले होते. आता पुढील टप्प्यातील निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा...   रब्बी हंगाम बहरणार !

अहवालानुसार मदतीचे वाटप 
 शेती पिंकासाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि फळबागासाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्‍टर प्रमाणे निधी देण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.१३ डिसेंबर २०१९) परभणी जिल्ह्याला १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षीक फळपिकांच्या नुकसानीसाठी मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना मिळणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार विभागीय आयुक्त यांनी कृषी यांना पाठवलेल्या व कृषी आयुक्तांनी राज्याचा अहवाल एकत्र करून शासनास सादर केलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी हे करणार आहेत. परिपत्रक ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढली आहे.

बॅंकाना रक्कम कपात करता येणार नाही
संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत घेणार मदत करण्यात येऊ नये. शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, यासाठी सहकार विभागाने योग्य त्या दिशेने करावी, अशा सक्त सुचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा...  काय आहे बंजारा हस्तशिल्प कला..? जाणून घ्या..

३१२ कोटीची केली मागणी

जिल्ह्यात ऑक्टोबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्याचा अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या ४ लाख ५६ हजार ९३३.२२ हेक्टर क्षेत्रावरील बाधीत पिकांची नुकसान भरपाई म्हणून ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यातील रक्कम मंजुर झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers in Parbhani ...!