मुंडेंची राजकीय इतिहासात छाप - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

बीड - लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात वेगळी छाप पाडणारे ठरले. सत्तेशी समझोता नव्हे, तर संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र होता. राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी आणि अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम गोपीनाथरावांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथरावांच्या कार्याला उजाळा दिला.   

गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी गोपीनाथगडावर आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की मुंडे हे वंचितांचे खरे नेते होते. गृहमंत्री असताना त्यांनी राजकारणातील गुन्हेगारी, सहकारातील मक्तेदारी, खंडणीमुक्त मुंबई अन्‌ अंडरवर्ल्डची दादागिरी संपविण्याचे काम केले. या वेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आदींची उपस्थिती होती. 

दरम्यान, यावेळी कुस्तीपटू राहुल आवारे, महिला क्रिकेटपटू कविता पाटील, सहारा अनाथालयाचे संतोष गर्जे, ऊस उचलण्याचे यंत्र तयार करणारे गुरलिंग स्वामी यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक उत्थान दिनानिमित्त महिला बचत गटांना कर्जवाटप आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली.

पंकजा मुंडेंना साथ
सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती या कार्यक्रमात एकत्र आले. शिवाय बहीण म्हणून पंकजा मुंडे यांना साथ देण्याचा शब्दही दोन्ही छत्रपतींनी दिला. मुंडे भगिनींच्या मागे दोन्ही छत्रपतींची ताकद आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले; तर मी छत्रपती म्हणून नाही, तर गोपीनाथरावांचा मुलगा म्हणून येथे आलो आहे, असे उदयनराजे म्हणाले.

Web Title: gopinath munde political history devendra fadnavis