हुतात्मा काकासाहेब शिंदेंचे स्मारक शासनाने उभारावे

मधुकर कांबळे
मंगळवार, 23 जुलै 2019

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीमध्ये  जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे कायगाव येथे शासनाने स्मारक उभारावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे कायगाव येथे शासनाने स्मारक उभारावे अशी मागणी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली.

विशेष बाब म्हणून हा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे यांनी ठराव मांडला की, कायगाव येथे जायकवाडी धरणासाठी संपादित केलेल्या परी क्षेत्रामध्ये शासनाने हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारावे, असा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजपचे मधुकर वालतुरे, काँग्रेसचे केशवराव तायडे यांनी अनुमोदन दिले.  

आचारसंहिता जरी लागू असली तरी विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, अविनाश गलांडे यांनी आज कायगाव येथे जाऊन हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत सुपूर्द केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should built a memorial of Kakasaheb Shinde