coronavirus - मायबाप सरकार ऊसतोड मजुरांचे किती हाल करणार - सुरेश धस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

एका मजुराचा मृत्यू होऊन त्याचा अंत्यविधीही तिकडेच करावा लागला. सरकार ऊसतोड मजुरांचे किती दिवस हाल करणार, त्यांचे बळी गेल्यावर जागे होणार आहे का, असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. 

बीड  - राज्याच्या मुख्य सचिवांनी काढलेल्या पत्रातील त्रुटींमुळे कामगारांचे हाल होत आहेत. त्या पत्रातील त्रुटीमुळेच सोनहिरा (जि. सांगली) येथून निघालेल्या मजुरांना खेडमध्ये अडविले. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कन्सेट लेटर न पाठविल्यानेच हा प्रकार घडला आहे. काल एका मजुराचा मृत्यू होऊन त्याचा अंत्यविधीही तिकडेच करावा लागला. सरकार ऊसतोड मजुरांचे किती दिवस हाल करणार, त्यांचे बळी गेल्यावर जागे होणार आहे का, असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेले लॉकडाउन आणि त्यामुळे ऊसतोड कामगारांची होणारी फरपट सध्या ऐरणीवरचा मुद्दा आहे. या मजुरांना गावी पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील मजूर परतत असताना त्यांना खेड व भिगवण (ता. कर्जत, जि. नगर) येथे अडविले. त्यानंतर तिथे जाऊन सुरेश धस यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करून या मजुरांना रवाना केले. दरम्यान, मजुरांना गावाकडे पाठविण्याच्या निर्णयातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी करीत सरकार कधी जागे होणार, असा सवाल सुरेश धस यांनी केला. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

दुसऱ्यांदा थेट मदतीला; नाश्‍त्याचीही केली सोय 
लॉकडाउनमुळे मागच्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी मजुरांना अडवून त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी सुरेश धस मध्यरात्री खेड-भिगवणला पोचले होते. मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांनी ठिय्या मांडला होता. जिल्हा हद्द ओलांडल्याच्या कारणाने त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

दरम्यान, आताही मजुरांना मध्यरात्री अडविले. सकाळपर्यंत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. मजुरांसोबत लहान मुले, बायका, जनावरे होती. सर्वांची आबाळ होत होती. सकाळ झाल्याने चहा नव्हता वा पोटात अन्नाचा घास नव्हता. या वेळी धस यांनी आष्टी येथून वाहनातून चहा-नाश्‍ता मागवून महिलांसह लेकराबाळांची चहा-नाश्‍त्याची सोय केली. ऊसतोड मजुरांच्या मदतीला सुरेश धस दुसऱ्यांदा थेट धाऊन आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government should stop the plight of sugarcane workers