नांदेड हादरले, कॉंग्रेसचे कोकूलवार यांच्यावर गोळीबार

प्रल्हाद कांबळे  
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

चारचाकी गाडीत बसण्याच्या तयारीत असतांना अज्ञात मारेकऱ्यांनी दुचाकीवर येऊन पाठीमागून पिस्तुलातून दोन फायर केले.

नांदेड - नांदेड शहराच्या विणकर कॉलनी भागात राहणारे कॉंग्रेसचे पदाधिकारी गोविंद कोकुलवार यांच्यावर त्यांच्या कार्यालयासमोर शनिवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गोळी झडली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईला हलविले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. 

चौफाळा परिसरात असलेल्या विणकर कॉलनीमध्ये कॉंग्रेसचे पदाधिकारी गोविंद तुळशीराम कोकुलवार यांचे कार्यालय आहे. ते आपल्या कार्यालयासमोर आपल्या चारचाकी गाडीत बसण्याच्या तयारीत असतांना अज्ञात मारेकऱ्यांनी दुचाकीवर येऊन पाठीमागून पिस्तुलातून दोन फायर केले. यात एक गोळी कमरेच्या वर लागली. तर दुसरी गोळी बरगडीला चाटुन गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. 

आज सकाळी गोविंद कोकुलवार हे आपल्या वकिलांना भेटण्यासाठी न्यायालयात आलो होते. त्यानंतर भेट झाली नसल्याने वकिलांच्या घरी न्यायनगरमध्ये गेलो. तेथून आपल्या मित्रासोबत घरी पोहचलो. घरुन कार्यालयात आलो. यावेळी त्यांच्यावर मारेकऱ्यांनी पाठीमागून गोळी झाडली. त्या धक्याने खाली पडलो, नेमके काय झाले हे त्यांना अद्याप समजले नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

जखमी अवस्थेत त्याना येथील ग्लोबल रुग्णालया दाखल केले. रुग्णालयात स्वत: माजी मुख्यमंत्री अशोकरव चव्हाण, आमदार अमर राजूरकर, पोलिस अधिक्षक संजय जाधव, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, प्रदीप काकडे, संदिप शिवले, प्रशांत देशपांडे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह कॉंग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी धाव घेतली. श्री. चव्हाण यांनी मुंबईशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी हवाई रुग्णवाहिका बोलावून घेतली. रात्री नऊ वाजता जखमी कोकुलवार यांना मुंबईला हलविले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी लावली असून मारेकऱ्यांचा शोध पोलिस घेत असल्याचे श्री. सुनील निकाळजे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govind Kokulwar injured in gunfire at Nanded