नियतीने घेतली निवृत्ती, ज्ञानदेवची परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

घरी वडिलांचा मृतदेह, मुलांची बारावी, दहावीची परीक्षा

घरी वडिलांचा मृतदेह, मुलांची बारावी, दहावीची परीक्षा
सगरोळी (ता. बिलोली) - घरात वडिलांचा मृतदेह आणि मुलांची बारावी, दहावीची परीक्षा. खरे तर मानवी जीवन म्हणजे एक परीक्षा असते, त्याचीच प्रचीती या घटनेतून आली. वडिलांच्या निधनाच्या दुःखात परीक्षा द्यावी की, घरी आई, वृद्ध आजीला सांभाळावे, हा प्रश्‍न समोर असतानाच निवृत्तीला नातेवाईक व गावातील लोकांनी धीर दिला. निवृत्तीने खतगाव येथील केंद्रावर जाऊन बारावीचा भूगोलचा पेपर दिला. परीक्षेहून परतल्यावर वडिलांना मुखाग्नी दिला. निवृत्तीचा लहान भाऊ दहावीला असून त्याचा पेपर शनिवारी आहे.

या हृदयद्रावक घटनेची माहिती अशी - अटकळी (ता. बिलोली) येथील शेतकरी गोविंद भूमा मेहत्री (वय 41) हे गुरुवारी नेहमीप्रमाणे चारा आणण्यासाठी शेतात गेले. सायंकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. शेतात आडोसा शोधून ते पावसापासून बचावाचा प्रयत्न करत होते; दुर्दैवाने त्याच ठिकाणी वीज कोसळली.

त्यामुळे शरीराची एक बाजू जळाली आणि गोविंद मेहत्री जागीच कोसळले. रात्री उशीर झाला तरी वडील घरी परत कसे आले नाहीत, या विवंचनेतून त्यांच्या मुलांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने गोविंद यांची मुले निवृत्ती व ज्ञानेश्‍वर हे आपल्या चुलतभावासह शेतात गेले. त्यावेळी वडील शेतात पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी उठवण्याचा व पाणी पाजण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत गोविंद यांची प्राणज्योत मालवली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. तोपर्यंत रात्री बराच उशीर झाल्याने शुक्रवारी (ता. 17) सकाळी गोविंद यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. याच दिवशी सकाळी मोठा मुलगा निवृत्तीचा बारावीचा भूगोलाचा पेपर होता. एकीकडे डोळ्यांसमोर वडिलांचा मृतदेह, आई, आजीच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा. लहान भाऊही दुःखात. सुन्न झालेल्या निवृत्तीला काय करावे, हेच कळेना. शेवटी नातेवाईक, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर निवृत्तीने अटकळीपासून जवळच असलेल्या खतगाव केंद्रावर बारावीचा पेपर दिला. परीक्षेनंतर गावी पतरल्यावर वडिलांना मुखाग्नी दिला. लहान भाऊ ज्ञानेश्‍वरचीही दहावीची परीक्षा सुरू आहे. त्याचा शनिवारी पेपर आहे.

शेतमजूर कुटुंबावर घाला
मेहत्री कुटुंबाची केवळ एक एकर शेती आहे. उदरनिर्वाहासाठी कुटुंबातील सदस्य शेतीत मजुरी करतात. त्यातच कर्ता पुरुष ऐन तारुण्यात गमावल्याने मेहत्री कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: govind mehatri death by electroluction