माजलगावात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक, ग्रेडरचा मनमानी कारभार

पांडुरंग उगले
Thursday, 10 December 2020

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

माजलगाव : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. चांगल्या प्रतीच्या कापसालाही दुय्यम दाखवून जवळपास ५०० रुपये कमीचा भाव देऊन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार माजलगावातील जिनिंगवर घडत आहे. शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक नुकसान करणाऱ्या ग्रेडरची बदली करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

शेतकऱ्यांची आता शासकीय कापूस खरेदी केंद्रावरच्या ग्रेडरकडून पिळवणूक होत आहे. तब्बल महिनाभराच्या उशिरानंतर माजलगावातील तीन जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी सुरु झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करून नंबर आल्यानंतर शेतकरी वाहनात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. चांगल्या प्रतीच्या कापसाला शासनाचा पाच हजार ८०० रुपये हमीभाव आहे. सध्या सर्वच शेतकऱ्यांकडे पहिल्या वेचणीचा चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही ग्रेडरकडून कमी भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयाचा फटका बसत आहे. खरेदी केंद्र सुरु होण्यापूर्वी खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आता जिनिंगवरील ग्रेडरकडून होत असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे.

जिनिंगकडे शेतकऱ्यांची पाठ
शहरापासून केवळ ४० किलोमीटरवर असलेल्या मानवत (जिल्हा, परभणी) येथील शासकीय जिनिंगवर पाच हजार ७२५ रुपये भाव मिळत आहे. ग्रेडरच्या मनमानीमुळे क्विंटलमागे पाचशे रुपयाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी माजलगावातील जिनिंगकडे पाठ फिरवून परभणी जिल्ह्यात कापूस नेणे सुरु केले आहे.

 

माझा चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही ग्रेडर मोरे यांनी जाणीवपूर्वक कमी भाव दिल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रोहन कदम, शेतकरी.

जिनिंगवर शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही. नियमाप्रमाणेच योग्य भाव शेतकऱ्यांच्या कापसाला देण्यात यावा. पिळवणूक करणाऱ्या ग्रेडरची वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाई करण्यात येईल.
संभाजी शेजूळ, सभापती, बाजार समिती.
 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grader Cheated Cotton Farmers Majalgaon