अजबच! आधी मत टाका, मगच ऊसाला तोडणी

sugarcane farmer.
sugarcane farmer.

कळंब (जि.उस्मानाबाद) :  तालुक्यातील 59 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका साखर कारखाना पट्ट्यातील होत आहे. माझ्या परस्पर ऊस तोडणी करायची नाही...तो आपल्याला पॅनलच्या उमेदवाराला मदत करीत नाही. ग्रामपंचायची निवडणूक ऊस तोडणी भोवती फिरू लागल्याचे चित्र आहे.

अमक्याचा ऊस तोडू नका अशी 'पिन' मारण्याचा उद्याोग गावागावात सुरू झाल्याने यामध्ये सर्वसामान्य उसउत्पादक शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना हेवे-दावे काढण्याची चांगली संधी मिळत आहे. याचा पुरेपूर फायदा काहीजण घेताना दिसत आहेत.

ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि ऊसतोडणी हंगाम एकत्रित आला आहे. मताची जूळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवार, पॅनल प्रमुख, कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसांचा अवधी आहे. तरीसुद्धा काहीजण उमेदवारी अंतिम समजून मताची वजाबाकी बेरीज करण्यास व्यस्त आहेत. बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी सर्वसाधारण आहेत.

यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. एकर दोन एकर ऊसाचे क्षेत्र असणारे बहुतांश शेतकरी कारखान्याचे सभासद नाहीत. त्यामुळे गावपुढारी किंवा कारखानदार यांच्यापुढे ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना पायघड्या टाकाव्या लागत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक असलेल्या गावात तालुक्यातील साखर कारखान्याच्या ऊसतोडणी टोळ्या दाखल झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावकार्यकर्ते, पँनल प्रमुख त्याचा पुरेपूर फायदा उठवत असल्याचे चित्र आहे.

ऊस गाळप करण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन काहीजण अमक्याचा ऊस परस्पर तोडू नका. ती व्यक्ती आमच्या गटाला सहकार्य करीत नाही. आमच्या गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक सुरु आहे. तुम्हाला ऊस तोडणी करण्यासाठी ज्यांचा फोन आलाय त्याला मला फोन करायला सागा म्हणजे मताच कसंय ते त्याला विचारून तुम्हाला ऊस तोडायचा का कसा हे सांगतो. अशी फोनाफोनी सुरू असल्याने शेतकरी वर्ग गोंधळून गेला असल्याचे चित्र आहे.

मतांच ठरलं की तोडणी-
ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत चुरसीने होते. एक एक मत उमेदवारासाठी या निवडणुकीत महत्वाचे असते. त्यातच निवडणूक आणि ऊस तोडणी हंगाम एकच आला आहे. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचा ऊस तोडणी करण्यासाठी प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मताच ठरलं की ऊस तोडणी सुरू होत असल्याचे चित्र तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूक क्षेत्रात पहावयास मिळत आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com