निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार; विधानसभेला मतदान केलेल्यांचे नावं यादीतून गायब

नीळकंठ कांबळे
Friday, 15 January 2021

मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळल्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मतदान न करताच परतावे लागल्याने मोठा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे

लोहारा (जि. उस्मानाबाद): तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता.१५) मतदान पार पडलं. सकाळपासून केंद्राबाहेर मतदरांनी गर्दी केली होती. परंतु अनेक गावांमध्ये बहुतांश मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळल्यामुळे मतदानासाठी आलेल्या नागरिकांना मतदान न करताच परतावे लागल्याने मोठा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. 

लोहारा तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या होत्या. परंतु यातील पाच ग्रामपंचायती निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निघाल्याने 21 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झालं. प्रत्येक गावांमध्ये अत्यंत अतीतटीच्या लढती झाल्याचे दिसले. निवडणुकीत एक-एक मत महत्वाचे असल्याने कामानिमित्त मुंबई, पुणे येथे असलेल्या मतदारांना घेऊन येण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था उमेदवारांनी केली होती.

दुर्दैवी ! एकीकडे मतदान सुरु झालं आणि दुसरीकडं उमेदवाराला मृत्यूनं गाठलं

आष्टाकासार, होळी, कानेगाव, भातागळी, कास्ती, बेलवाडी, करजगाव, एकोंडी या ठिकाणी कमालीची चुरस दिसली. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. वयोवृध्द, दिव्यांग मतदारांना वाहानातून मतदान केंद्रावर आणले जात होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावातील मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे सोमोर आले आहे.

तर कास्ती (खुर्द) येथे बेंडकाळ गावातील काही मतदारांचा समावेश मतदार यादीत समावेश केला गेला. परंतु स्थानिक मतदारांना यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले. भातागळी येथेही असाच प्रकार घडला आहे. विधानसभेसाठी मतदान केलेल्या सुमारे अडीचशे मतदारांचे नावे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

अशीच परिस्थिती अन्य गावांत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदानासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या नागरिकांना मात्र मतदान न करता परतावे लागल्याने हिरमोड झाला. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगत प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्क्रिंनिंग व्यवस्था करण्यातआली होती. मतदानासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांची ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात आली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat news lohara usmanabad political news