ग्रामपंचायत निवडणुकीसाठी धावपळ, उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

सुभाष बिडे
Monday, 21 December 2020

कागदपत्रे काढण्यासाठी इच्छुकास पॅनल प्रमुखांसाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी (जि.जालना) : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तसेच राखीव जागेवर निवडणूक लढवीत असल्यास जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र अन्यथा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जातीची वैधता तपासणीकरिता जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याचा पुरावा जोडणे आवश्‍यक असते. त्यामुळे कागदपत्रे काढण्यासाठी इच्छुकास पॅनल प्रमुखांसाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.

 

नामनिर्देशनपत्र भरतांना अनामत रक्कम जमा करणे, उमेदवार दुसऱ्या प्रभागातील मतदार असल्यास त्याबाबतचा उतारा सोबत जोडणे आवश्‍यक आहे.  घोषणापत्र गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याबाबत व मालमत्तेबाबत, अपत्याबाबत घोषणापत्र, हमीपत्र जात वैधता प्रमाणपत्र सादर  करण्याबाबत, घोषणापत्र निवडणूक खर्च दाखल करण्यासंदर्भात अनर्थ घोषित केले नसल्याबद्दल, हमीपत्र निवडणूक खर्च सादर करण्याबाबत ही प्रमाणपत्रे साध्या कागदावर, महिलेचे माहेरकडील जात प्रमाणपत्र असल्यास शंभर रुपयाच्या बॉँड पेपरवर शपथपत्र, शौचालय दाखला ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचा ठेकेदार नसल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला, ग्रामपंचायत थकबाकीदार नसल्याचा ग्रामसेवक दाखला (मालमत्ता कर सोडून) ही कागदपत्रे मूळप्रतीत तर मतदार यादीत नाव असलेला उतारा, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (नसल्यास हमीपत्र व समितीकडे सादर केल्याची पावती), शैक्षणिक पुरावे (टीसी, सनद आदी), ओळखपत्र (निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड आदी), ग्रामसेवक रहिवासी प्रमाणपत्र  आदी प्रमाणपत्रे लागतात.

 

 

राखीव प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्‍यक असते. अनुसूचित जाती, व्हीजे, एनटी, एसबीसी, ओबीसी आदी राखीव जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात पडताळणी समितीकडे बार्टीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर पाचशे रुपये शुल्क भरल्यानंतर सर्व कागदपत्रांची प्रिंट काढून जात पडताळणी समितीच्या कार्यालयात समक्ष दाखल करावयाचे आहे. त्यानंतर जात पडताळणी समिती कार्यालय संबंधिताला सही शिक्‍क्‍यांची पोच देईल.  ती पोच नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात जात पडताळणी समितीकडे करावयाचा अर्ज कुठल्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.

जात वैधता प्रमाणपत्र संबधाने ग्रामपंचायत निवडणूक २०२० -२१ संबंधित संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरतांना अर्जदारांची जात प्रमाणपत्र शपथपत्र अर्ज,  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे शिफारस पत्र व सही शिक्का, अर्जदारांच्या वडिलाचे तसेच आजोबांचे मूळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,  प्रवर्गानुसार मान्य तारखेपूर्वी रहिवासी महसुलचा जात नोंदी पुरावे, अनुसूचित जातीसाठी १९५०, ओबीसी व एसबीसी १९६७,  व्हीजे व एनटी १९६१ चा पुरावा उमेदवारांनी मूळ जात प्रमाणपत्र अपलोड करताना त्यांनी जात प्रमाणपत्रावरील अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, पत्त्यावर जात वैधता प्रमाणपत्रांची कॉपी मिळेल.

योग्यरीत्या प्रिंट काढून योग्य प्रिंट झाली की नाही याची खात्री करून घ्यावी, ऑनलाइन अर्ज पूर्णपणे भरणे  व सर्व मूळ कागदपत्रे अपलोड केले असेल तरच अर्ज कार्यालयात स्वीकारले जातील. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी सांगितले.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchayat Election Aspirant Candidates Run For Documents Ghansawangi