वादळी वारे, मेघगर्जना अन् पावसाची हजेरी, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच गिरगाव येथे सोमवारी मध्यरात्री खंडोबा मंदिरावर वीज कोसळल्याने स्‍पीकरचे युनीट जळाले आहे तर मंदिराला देखील भेग पडली आहे.

हिंगोली ः तालुक्‍यातील बळसोंड भागात मंगळवारी (ता.१४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक मेघगर्जना व वाऱ्यासह पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला तर हिंगोली शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाने शेतशिवारात सुरू असलेल्या कामासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.

मागच्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून तापमान ३९ अंशावर गेले आहे. त्‍यामुळे उष्णता वाढली आहे. अधून-मधून ढगाळ वातावरण, वादळी वारे व पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

हेही वाचा - रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हिंगोलीकर रमले योगसाधनेत...

सोमवारी रात्री येथे झाला पाऊस 
सोमवारी वसमत तालुक्‍यातील गिरगाव, हयातनगर या भागात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर मंगळवारी सायंकाळी हिंगोली शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले होते मेघगर्जना सुरूच होती. दरम्‍यान, या पावसाने शेतशिवारात सुरू असलेल्या गहू काढणी, हळदी काढणीच्या कामात व्यत्‍यय येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात हळद काढून ती वाळत घातली आहे. मंगळवारचा पाऊस बळसोंड, अंधारवाडी, सिरसम, कारवाडी, खांबाळा, बेलवाडी आदी गावात झाला. 

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ निर्णयामुळे हिंगोलीकरांना काहीसा दिलासा...

गिरगावात मंदिरावर वीज कोसळून नुकसान
गिरगाव ः वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सोमवारी (ता.१३) मध्यरात्री दीडच्या सुमारास खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज पडून घुमटावर असलेल्या स्‍पीकरच्या युनिटचे नुकसान झाले आहे. तर मंदिराला देखील आतमध्ये भेग पडली आहे. गिरगाव येथे सोमवारी रात्री अचानक मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यातच मध्यरात्री येथील खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोळसून मंदिराच्या घुमटावर असलेल्या स्‍पीकरचे दोन युनिटचे नुकसान झाले आहे. तसेच मंदिराला देखील भेग पडली आहे. यामुळे अंदाजे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळी तलाठी यू.बी.मैड, सरपंच मारोतराव कुंभारकर, पोलिस पाटील गंगाधर शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बारसे यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. 

हयातनगर येथे मेघगर्जनेसह पाऊस
हयातनगर ः वसमत तालुक्‍यातील हयातनगर येथे सोमवारी (ता.१३) मध्यरात्री मेघगर्जनेसह अर्धातास पाऊस झाला. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची वाळत घातलेली हळद झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. सध्या अनेक शेतकरी शेतात राहत असल्याने त्‍यांना वेळीच हळद झाकता आली, तर जे घरी आहेत मात्र त्‍यांची हळद शेतात वाळत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunderstorms, thunder and rain, read where hingoli news