हिंगोलीच्या दूध कट्ट्यावरील मोठा अनर्थ टळला; भरधाव कारने दूध विक्रेत्यांच्या दुचाकींना चिरडले

राजेश दारव्हेकर
Thursday, 21 January 2021

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र  पाच ते सहा दुध विक्रेत्यांच्या दुचाकीचे  नुकसान झाले आहे.

हिंगोली : शहरात भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने गणपती चौकात दूध विक्रीसाठी आलेल्या दूध विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या दुचाकींना धडक दिल्याने दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ ते साडेआठ वाजता घडली.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र पाच ते सहा दूध विक्रेत्यांच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे. शहरात यापूर्वी बाहेर गावातुन दूध विक्रीसाठी येणारे दूध विक्रेते रामलीला मैदानावर दुध विक्रीसाठी थांबत होते. येथे दूध कट्टा म्हणून ओळखले जात होते. मात्र येथे आता मागच्या काही दिवसापासून फुटकळ व्यापारी यांच्यासह दूध विक्रेते यांना मनाई करून रामलीला मैदानावर उद्यान विकसित होत आहे. यामुळे मागच्या काही दिवसांपासून दूध विक्रेते गांधी चौक व गणपती चौकात दूध विक्रीसाठी थांबत आहेत. यामुळे दररोज सकाळी येथे दूध विक्रेत्यांची गर्दी असते. दरम्यान, गुरुवारी सकाळी एका भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाने रस्त्यावरील उभ्या असलेल्या मोटरसायकलींना जोराची धडक दिली. यावेळी येथे काही जण हाँटेलवर चहा व नास्ता घेत होते. अचानक आलेल्या या कारने उभ्या वाहनांना धडक दिल्याने येथे उभे असलेले नागरिक, दूध विक्रेते  बाजूला सरकले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसल्याचे येथे उभ्या असलेल्या नागरिकांनी सांगितले.  

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. मात्र भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने दूध विक्रेत्यांच्या दुचाकींना धडक दिल्याने सर्व दूध रस्त्यावर सांडले होते. तसेच वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The great calamity averted on the Hingoli milking parlor hingoli news