'जबाबदार पालकत्व' कार्यशाळेला तुडुंब प्रतिसाद, 'सकाळ, सभु'तर्फे उपक्रम 

Great Response to the Responsible Guardianship workshop Sakal Sabu initiative
Great Response to the Responsible Guardianship workshop Sakal Sabu initiative

औरंगाबाद : "मूल काय सांगते, ते आधी ऐका. सूचनांचा भडिमार करू नका. नाहीतर मुलं तुमच्याजवळ बोलायचं टाळतात. त्यापेक्षा सहज गप्पांमधून त्यांना आपलंसं करा,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विशेष कार्यशाळेत पालकांना दिला. 

'सकाळ माध्यम समूह' आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे शनिवारी (ता. 13) पालकांसाठी खास कार्यशाळा घेण्यात आली. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात सरस्वती भुवन आणि शारदा मंदिर प्रशालेतील मुला-मुलींच्या पालकांसाठी दोन सत्रांत झालेल्या या कार्यशाळेचे उद्‌घाटन संस्थेचे सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, 'सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, वृत्तसंपादक रणजित खंदारे, स. भु.चे सहचिटणीस ज्ञानप्रकाश मोदाणी, कोषाध्यक्ष जुगलकिशोर धूत, शालेय समिती अध्यक्ष अरुण मेढेकर, डॉ. रश्‍मी बोरीकर यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे आणि समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी पालकांशी संवाद साधला. 

"आपल्या मुलांना चांगला माणूस बनवा. पैसे बनवण्याचं यंत्र नव्हे. मुलं बारकाईनं निरीक्षण करतात. जसं तुम्ही वागाल, तसंच ते वागतील. घरातील ज्येष्ठांशी तुमचे जे वर्तन असते, तसेच वर्तन मुलं तुमच्या म्हातारपणी करतील. त्यामुळे स्वतः जबाबदारीने वागा आणि मुलांनाही जबाबदार नागरिक बनवा,'' असे डॉ. श्रीरंग देशपांडे प्रास्ताविकात म्हणाले. 

"आपली मुले जशी आहेत, तसा त्यांचा स्वीकार करा. इतर मुलांशी तुलना करू नका. अत्यंत आवश्‍यक असल्याशिवाय मुलांचे हट्ट पुरवू नका. त्यांना ठाम 'नाही' म्हणायला शिका. कुठलेही प्रश्‍न न विचारता, चौकशा न करता मुलांशी गप्पा मारा. जंक फूड, बिस्कीटे, वेफर्स आणि बाहेरचे खाद्यपदार्थ देणं कमी करा. घरीच बनवलेले वेगवेगळे पौष्टिक पदार्थ द्या, अशा शब्दांत डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना अनेक महत्त्वाच्या टिप्स दिल्या.''

डॉ. संदीप शिसोदे म्हणाले, "आठ ते बारा या वयोगटात मुलांना आईवडिलांकडून योग्य वर्तणूक दिली जाणे आवश्‍यक असते. कारण 54 टक्के सायकोटिक आजारांचे मूळ या वयातील मानसिकतेत दडलेले असते. सतत सूचना देत राहिल्याने मुलांची समजावून घेण्याची क्षमता कमी होते. आपलेच विचार आपल्या वर्तनात येत असतात. त्यामुळे मुलांशी जपून वागा.''

पालकांनीही आपल्या पाल्याच्या वागण्या-बोलण्याच्या आणि अभ्यासासंबंधी प्रश्‍न विचारून निराकरण करून घेतले. रुपाली पाटील आणि अंजली मुलाटे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शिरीष मोरे आणि सुरेखा देव यांनी आभार मानले. शेकडो पालकांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com