esakal | नांदेडमध्ये किराणा मालाची चढ्या भावाने विक्री 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

देशात लॉकडाऊन सुरु असल्याने मालवाहतुक करणाऱ्या गाड्याही बंद आहेत. परिणामी जिवनावश्‍यक वस्तू विक्री करणारे दुकानदार लॉकडाऊन काळात ‘हात धुऊन’ घेतानाचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, कलम १४४ पायदळी, प्रशासन सॅनिटायझर लावण्यातच व्यस्त असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नांदेडमध्ये किराणा मालाची चढ्या भावाने विक्री 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : संपूर्ण जग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मदतीसाठी असंख्य सामाजिक संस्था पुढे येत आहेत. असे असताना दुसरीकडे काही दुकानदार लॉकडाऊनचा फायदा ग्राहकांना लुटण्यासाठी करीत आहेत. शहरातील अनेक भागात कलम १४४ पायदळी तुडवले जात असताना प्रशासनाने मूग गिळलेत काय? असा सवाल आता सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. लोकांनी मात्र त्याचा इव्हेंट केला. त्यानंतर देशभरात संचारबंदी लागू केली. तत्पूर्वीच जमावबंदी कलम १४४ लागू केले; मात्र लोकांनी त्याचा फज्जा उडवला. लोक रस्त्यावर खुलेआम फिरत असताना प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत. सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करतांना रात्री १२ वाजेपासून लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांचे भाषण संपण्याआधीच लोकांनी दुकानांवर खरेदीसाठी तोबा गर्दी केली. चार तासांत लोकांना दुकानदारांनी लुटले. त्यानंतरही हा प्रकार सर्रास सुरूच आहे. आता साखर, तेलाच्या दरात नेहमीपेक्षा २० ते ३० रुपयांनी वाढ केलेली आहे.

हेही वाचा - `हे’ नागरिक आहेत देशाची संपत्ती, कोणते? ते वाचाच

सोशल डिस्टन्सिंग नावालाच....
दुकानांवर किराणा माल घेताना तसेच भाजीपाला खरेदी करताना प्रत्येक ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यादृष्टीने बॅंक, किराणा दुकान, मॉल्स, भाजीपाला मार्केट आदी ठिकाणी पांढऱ्या रंगाचे बॉक्सही आखून दिले आहेत. मात्र, दुकानांवर, भाजीपाला खरेदी करताना होणारी गर्दी पाहता, त्याचे पालन का होत नाही? याची पाहणी होते का? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

सदस्याला दर महिन्याला पाच किलो धान्य मोफत
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पात्र लाभार्थ्यांना प्रति सदस्य एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात यावे, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देण्यात आले आहेत. यासाठी तांदळाचे नियतन प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतांनाही बऱ्याच राशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात येत नसून यासंदर्भात गरीबांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था कायम असून या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे

येथे क्लिक करा - Video : सोशल डिस्टन्स पाळत ग्राहक बँकांच्या आवारात
 
साठेबाजांवर कारवाई व्हावी
आम्हाला होलसेलमध्ये पुरेसा व योग्य दरात किराणा साहित्याचा पुरवठा झाला तर आम्हीही नेहमीच्या दरात ग्राहकांना विकू. त्यासाठी प्रशासनाने काही व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर आळा घातला पाहिजे. सध्याची अडचण आम्हालाही कळते. परंतु, काही व्यापारीच साठा करून दर वाढवित आहेत. त्यामुळे त्यांचा आधी बंदोबस्त करा, अशी मागणी शहरातील किराणा दुकानदार करीत आहेत. 

असे आहेत किराणाचे दर
 

वस्तु पूर्वीचे दर (किलोमध्ये) आताचे दर (किलोमध्ये)
साखर ३५ ४२
सोया, पामतेल ८५ ९६ (बॅग)
रेग्युलर तांदुळ ४० ४७
शेंगदाणे ९५ १३५
तूरदाळ ९० १००
गहू २५ ३०


हे देखील वाचा -  ‘मला बोलायचे आहे’.....लॉकडाऊनच्या काळात व्हा व्यक्त

प्रशासकीय स्तरावरुन कार्यवाही करावी 
शासन स्तरावरून आजघडीला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. ते प्रयत्न सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी झाले पाहीजेत व विशेषतः राशन दुकानदार व चढ्या भावाने विक्री करण्यात येत असलेल्या किराणा दुकानदारांवर कार्यवाही झाली पाहीजे.  सर्वसामान्य जनतेला आणि गोरगरिबांना उपलब्ध सुविधांचा लाभ झाला पाहीजे. अन्यथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत सदरील समस्या पोहचविल्या जातील. 
- मुन्ना राठौर, शिवसेना उपशहरप्रमुख