Video : सोशल डिस्टन्स पाळत ग्राहक बँकांच्या आवारात

शिवचरण वावळे
Friday, 3 April 2020

प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला खातेदारांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आलेली रक्‍कम खात्‍यामधून वाटप करायला सुरुवात झाली. त्यामुळे बॅंक व बॅंक ग्राहक सेवा केंद्रात नागरीकांची गर्दी टाळण्‍यासाठी कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व संबंधित यंत्रणा व बँकांना दिले आहेत.

नांदेड : सध्या बँकेत ज्येष्ठ नागरीकांचे पेन्शन, काही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि प्रधानमंत्री जनधन योजनेचे खातेधारक महिला यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता.तीन एप्रिल २०२०) रोजी शहरातील बहुतेक बँकेच्या आवारात ग्राहकांची सोशल डिस्टन्स पाळत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत होती. मात्र बॅंकेच्या आवारातील गर्दीमध्ये सुसुत्रता बघायला मिळाली.

शहरातील शिवाजीनगर परिसरातील एसबीआय शाखा सर्वात मोठी शाखा आहे. या बँकेशी लाखो ग्राहक जोडले गेले आहेत. त्यानंतर नवीन मोंढा, छत्रपती चौक, अशोकनगर, वजिराबाद अशा विविध ठिकाणच्या बँकेंच्या शाखेत ज्येष्ठ नागरीकांनी पेन्शन उचलण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शिवाय काही शासकीय कार्यालयाच्या पगार देखील बँकेत जमा झाला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी देखील पगार उचलण्यासाठी बँकेत दाखल झाले होते.

परंतु बॅकांच्या परिसरामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये ठराविक अंतर ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाने मार्किंग केले होते. त्यामुळे खात्यातुन रक्कम काढण्यासाठी बँकेत येणाऱ्या नागरीकांना वेगळी सुचना करण्याची फारशी गरज भासत नव्हती. ‘कोरोना’च्या भितीने प्रत्येकजन एकमेकात अंतर राखण्यासाठी पुरेपुर काळजी घेत होते.

हेही वाचा - खबरदार...बँकांनी निर्देश पाळले नाही तर होणार कारवाई

कोरोना हा महाभयंकर आजार असल्याचे आता प्रत्येक नागरीकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या आजाराला घरातच राहुन हरविले जाऊ शकते. असे सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आले असले तरी, अनेकजण विनाकारण रस्त्यावरुन फिरत असल्याने पोलीसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, बँकेत येणारे सर्व नागरीक सुज्ञ असल्याने गरजेपुरते पैसे काढण्यासाठी लोक बँकत येत आहेत.

दुसरीकडे साथरोग प्रतिबंधात्‍मक कायद्यामधील तरतुदीनुसार संदर्भात नमुद अधिसुचना १४ मार्च २०२० मध्‍ये जिल्हादंडाधिकारी यांनी प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. त्यामुळे देखील ग्राहक आणि बँक कर्मचारी यांनी कुठलाही गोंधळ न होऊ देता बँकेचे व्यवहार सुरु ठेवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

हेही वाचलेच पाहिजे  सावधान...! मुलांच्या भावविश्‍वातील खदखद घ्या जाणून

सध्या बँकेत ज्येष्ठ नागरीकांची पेन्शन, काही शासकीय कार्यालच्या कर्मचारी यांच्या पगारी व प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकेत पैसे जमा झाले आहेत. मात्र सध्या ज्येष्ठ नागरीक आणि पगार धारक खात्यातुन पगार काढण्यासाठी येत आहेत. यामध्ये महिलांची संख्या खुप कमी असल्याचे एसबीआयचे सहाय्यक जनरल मॅनेजर उमेश ढाके यांनी सकाळशी बोलताना सांगितले.  

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In The Premises Of Consumer Banks Keeping Social Distance Nanded News