...म्हणून मंगलअष्टके संपताच लग्नातच पडल्या बेड्या!

मनोज साखरे
शुक्रवार, 31 मे 2019

मंगलअष्टके संपताच पकडले 

औरंगाबाद : वऱ्हाडी मंडळी जमली. लग्नघटीका आली. शुभ मंगल सावधान..अशा अक्षदा पडल्या, लग्न लागले अन..पोलिसांनी बनावट कागदपत्राद्वारे साडेनऊ लाखांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या संशयिताला (ता. 30) त्याच लग्नात बेड्या ठोकल्या. लग्नात त्यांनाच सावधान म्हणण्याची वेळ आली. 

अमोल अशोक लोखंडे (वय 28, रा. अंतरवाला) अशी संशयिताचे नावे आहेत. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळ राणा कॉम्प्लेक्‍समध्ये आयकेएफ फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. 2015 मध्ये संशयित अमोल व त्याचा भाऊ अजय याने आयशर वाहनाचे आरसी बुक सादर करून साडेनऊ लाखांचे वाहनकर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न करताच दोघे पसार झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीने कागदपत्रांची तपासणी केली. त्यात संशयितांनी बनावट आरसी बुक जोडल्याचे समोर आले. या प्रकरणी वसुली अधिकारी किरण बाळू गायकवाड (27, रा. अशोकनगर, मसनतपूर) यांच्या तक्रारीनंतर 20 ऑगस्ट 2018 ला पुंडलिकनगर ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

गुन्हा नोंद झाल्याचे समजल्यानंतर संशयित पसार होते. त्यांना जालना जिल्ह्यातील अंतरवाला येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक विनायक कापसे, हवालदार गणेश डोईफोडे, कल्पना जांबोटकर यांनी केली. 

मंगलअष्टके संपताच पकडले 

अमोलच्या आतेबहीणीचे जालना जिल्ह्यातील अंतरवाला येथे लग्न होते. त्यासाठी तो तिथे आला होता. याची माहिती माहिती पुंडलिकनगर पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिस पथक अंतरवाला येथे पोचले. मंगलअष्टके संपण्याची त्यांनी वाट पाहीली. ती संपताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत औरंगाबादेत आणले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Groom Arrested after Marriage Ceremony Completed in Aurangabad