शहर बस पुढे पुढे... अन्‌ प्रवासी मागे मागे! 

Smart city bus
Smart city bus

औरंगाबाद -  स्मार्ट शहर बस पळविण्याचेच काम सध्या सुरू आहे. एसटीचे कर्मचारी रस्त्यातील थांब्यांवर बस थांबविण्यास उत्सुक नाहीत. मुख्य थांब्यावरून निघालेली बस प्रवाशांचा विचार न करता पुढे पुढे धावते. अनेकदा तासन्‌तास थांब्यावर थांबूनही बस मिळत नाही. एखादी बस समोरून गेली तर ती थांबतच नाही. "सकाळ'ने गुरुवारी (ता.14) शहर बससेवेबाबत केलेल्या "ग्राऊंड रिपोर्ट'मध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा हा निष्काळजीपणा पुन्हा बससेवेची माती करणार अशा सहज आणि संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या तोंडातून निघत आहेत. 

शहरात मोठ्या थाटात स्मार्ट शहर बससेवेचे उद्‌घाटन झाले. शहराच्या नावलौकिकात भर घालणारी ही बससेवा लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही. मात्र, एसटीचे कर्मचारी प्रवासीकेंद्रित सेवा देत नाहीत. स्मार्ट बस प्रवाशांसाठी नाही, ती आपल्या नोकरीसाठी आहे. असाच काहींचा समज एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आहे. एसटीची बससेवा लोकाभिमुख करण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे, याचे साधे भानही कर्मचाऱ्यांना नाही, ही गंभीर बाब समोर आली. एसटी महामंडळाने स्मार्ट शहर बसचे अर्धवट वेळापत्रक जाहीर केले. सध्या हे वेळापत्रक कुठेही लावण्यात आलेले नाही. जे वेळापत्रक जाहीर केले, त्याच्या वेळेप्रमाणे एकही बस धावत नाही. सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशन, हर्सूल सावंगी, चिकलठाणा, बजाजनगर या महत्त्वाच्या थांब्यांवरून वेळापत्रकाप्रमाणे बस निघतच नाहीत. मुख्य थांब्यावरून बस निघाल्यानंतर केवळ चक्कर मारून परत येणे एवढेच आपले काम असल्याच्या आविर्भावात कर्मचारी वागत आहेत. रस्त्यात बसमधील प्रवाशांना उतरविण्यासाठी बसथांब्याच्या खूप पुढे किंवा खूपच मागे बस थांबविली जाते, बस थांबल्याचे दिसताच काही प्रवासी धावत जाऊन बस गाठतात, अनेकजण बसपर्यंत येतात; पण तोपर्यंत बस निघून गेलेली असते. 
 
प्रवासी सैरभैर 
सिडको बसस्थानकातून शहरबस सेवा चालवली जाते. मात्र, सिडको बसस्थानकात कुठेही एसटीचा कर्मचारी बस केव्हा येईल हे सांगण्यासाठी उपलब्ध नव्हता. प्रवासी सैरभैर इकडून तिकडे फिरत होते. हीच संधी शोधत रिक्षाचालक सिडको बसस्थानकात घुसून प्रवाशांना पळवून नेत असल्याचे चित्र दिसत होते. 
 
हर्सूलला पाच तास खाडा 
हर्सूल सावंगी ते रेल्वेस्टेशन ही मुख्य बसस्थानक मार्गे जाणारी सिटी बस तब्बल पाच तास धावलीच नाही. सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 दरम्यान तीन बस धावणार असल्याचे वेळापत्रकात नमूद केले आहे. सकाळी 7.30, 9.30 या दोनच बस धावल्याचे या मार्गावरील बसचालकाने सांगितले. सकाळी 9.55, 10.40 आणि 11.25 या वेळेची बस धावलीच नाही. तब्बल अडीच वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती. 
 
 बस दिसल्या, प्रवासी फसले 
हर्सूलच्या हनुमान मंदिराजवळ सकाळी 11.30 ला एक सिटी बस आली. हात दाखवल्यानंतर सिटी बस थांबली. त्या गाडीत प्रवासी बसले, तर ही बस शाळेसाठी आहे आणि हर्सूल टी पॉइंटपर्यंतच जाणार आहे, असे सांगून वाहकाने लगेचच उतरविले. त्यानंतर दुपारी 12.07 ला एक सिटी बस (एमएच 20, ईजी 9869) आली. त्यातही शाळेची मुले होती. या वाहनचालकाने हात दाखवूनही थांबण्याची तसदी घेतली नाही. 
 
प्रवाशांनी फिरवली पाठ 
सावंगी येथून तीन महिला प्रवाशांना घेऊन दुपारी 1.10 ला निघालेल्या (एमएच-20, ईजी-9872) सिटी बसमधून सगळेच प्रवासी हर्सूल टी पॉइंटला उरतले. त्यानंतर या सिटी बसमध्ये दुपारी 1.30 पर्यंत एकही प्रवासी चढला नाही. जळगाव रोडवरील तापडिया नाट्यगृहासमोर एका वयस्क प्रवाशाने गजानन महाराज मंदिराकडे सिटी बस जाणार का, अशी विचारणा केली. मात्र, बस सिडको बसस्थानकात गेली. 
 
उजव्या बाजूनेच धावते बस 
सावंगी ते सिडको सिटी बस (एमएच-20, ईजी-9872) रस्त्यावरून धावताना दुभाजकाच्या शेजारून म्हणजेच उजव्या बाजूने धावली. सिग्नललाही उजव्या बाजूलाच थांबली. वास्तविक सिग्नल सुटल्यानंतर डाव्या कोपऱ्यावर प्रवासी वाट पाहत उभे होते. तिथेच रिक्षाही उभ्या होत्या. मात्र, सिटी बस चालक सिग्नल सुटल्यानंतर डाव्या कोपऱ्यावर बस नेत नव्हते. याचा लाभ रिक्षाचालकांनाच अधिक होत आहे.  
 
सिटी बसच्या थांब्यावर रिक्षाचालकांची मनमानी 
सिडको बसस्थानकातील थांब्यावर दुपारी 1.30 वाजता दहा सिटी बस उभ्या होत्या. त्या ठिकाणी बाहेरगावाहून आलेल्या आणि खचाखच भरलेल्या एसटीतून सुमारे 50 हून अधिक प्रवासी उतरले. उतरत असतानाच रिक्षाचालक बाबा पेट्रोलपंप, मुख्य बसस्थानकासाठी लागणारे प्रवासभाडे दहा रुपये सांगून फसवत होते. यावेळी उतरणाऱ्या प्रवाशांनी सिटी बसकडे पाहिले, ना वाहतूक निरीक्षकांनी रिक्षाचालकांकडे पाहिले. सिटी बसचे चालक, वाहकांशिवाय इथे कोणीच नसल्याने या अनागोंदीची तक्रार करायची कुठे? हा प्रश्‍नही उपस्थित होतो. 
 

कुठे काय दिसले? 
 

प्रवासी प्रतीक्षेतच 
"सकाळ'ची टीम सिडको बसस्थानकात सकाळी 11.30 वाजता पोचली. त्यावेळी अनेक प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत होते. बजाजनगर, क्रांती चौक, रेल्वेस्टेशन, हर्सूल, चिकलठाणा अशा विविध भागांत जाणारे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत होते. 
  
आता कुणाला विचारावे? 
एसटीच्या चौकशी कक्षात डॉक्‍टरांकडून कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना माहिती देण्यासाठी वाहतूक निरीक्षक अथवा कुणीही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. 
 
बस मिटमिट्याची, सांगितले क्रांती चौक! 
तब्बल तासाभराने साधारण 12.40 वाजता सिडको ते मिटमिटा बस (एमएच-20, ईएल-0281) आली. विशेष म्हणजे बसला पाटी (डिस्प्ले) नव्हती. तरीही चालक-वाहक क्रांती चौक असे सांगून प्रवाशांना बसवत होते. अनेकांनी तिकीट काढल्यानंतर ही बस मिटमिट्याला जाणार असल्याचे लक्षात आले. 
 
कर्मचाऱ्यासाठी थांबली बस 
सिडको-मिटमिटा (एमएच-20, ईएल-0281) बस सेव्हन हिलला एसटीच्या कर्मचाऱ्यासाठी थांबली. बस खूप पुढे थांबल्याने मागे असलेल्या प्रवाशांना बस गाठता आली नाही. बस निघाल्यावर दोन विद्यार्थी धावत पोचले. बसमधील काही जणांनी आग्रह केल्याने त्यांना घेण्यात आले. 
 
सुसाट निघाली बस 
सिडको मिटमिटा बस (एमएच-20, ईएल -0281) सेव्हन हिलनंतर सरळ पुढे पुढे जात होती. रस्त्यात उतरणाऱ्या प्रवाशांना सोडण्यात येत होते. प्रवासी उतरताना कुणी आले तरच त्यांना घेतले जात होते. मात्र कुठे प्रवासी दिसतो का, त्याला घेता येईल का, अशी तसदी चालक-वाहक घेत नव्हते. भरगच्च बस महावीर चौकात (बाबा पेट्रोल पंप) खाली झाली. 
 
चालकाचे प्रवाशाला उद्धट उत्तर 
रेल्वेस्थानकावर 1.30 वाजता बस (एमएच-20, ईजी-9866) ही रेल्वेस्टेशन-टीव्ही सेंटर मार्गे सिडको बस आली. बस भरून निघाल्यानंतर खाली राहिलेल्या काही प्रवाशांनी आवाज दिला. मात्र बस थांबवण्याची तसदी चालकाने घेतली नाही, म्हणून तुम्ही बससेवा बंद पाडणार असा संताप बसमधील एका प्रवाशाने व्यक्त केला. त्यावर क्षणाचीही विलंब न करता चालकाने हो आम्हीच बस बंद पाडू असे उद्‌धट उत्तर दिले. 
 
सरळ निघाली बस

सिडको बसस्थानकात तासाभराच्या प्रतीक्षेनंतर एक बस (एमएच-20 ईजी-9876) आली; पण ही बस सरळ बाहेर निघाल्याने, काही जणांनी प्रवेशद्वारावर थांबविली. बस नारेगाव असल्याचे महिला वाहकाने सांगितले. मात्र थांब्यावरील एकालाही घेतले नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जात असल्याचे अरेरावीच्या भाषेत सांगत, नारेगावला जाणाऱ्या प्रवाशांनाही घेण्याची तसदी घेतली नाही. 
 
बसची अर्ध्यातासाची प्रतीक्षा
रेल्वेस्थानकावर 1.30 वाजता शहागंज जाणारी बस (बस क्र. एमएच-20-ईजी-9854) उभी होती. तापत्या उन्हात प्रवाशी बसमध्ये त्रस्त होते. मात्र बसमध्ये चालक, महिला वाहक आणि ड्युटी संपुन निघालेली एक महिला वाहक गप्पात दंग होते. वारंवार विचारल्यानंतर 2.00 वाजता बस निघेल, असे सांगण्यात येत होते. प्रत्येक प्रवाशाला रंगलेल्या गप्पांचा संताप येत होता. 
 
एजंटांनी पळवले प्रवासी 

सिडको बसस्थानकात दुपारी 11.00 ते 12.40 दरम्यान जवळपास शंभरावर प्रवासी उभे होते. त्रस्त झालेल्या प्रवाशांना ""बाबा... बसस्टॅंड...'' करीत बाहेरून आलेल्या एजंटांनी अक्षरश: पळवून नेले. बसस्थानकातून प्रवासी पळवले जात असताना, त्यांना रोखण्यासाठी एसटीचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकही बघ्याच्या भूमिकेशिवाय काहीही करत नव्हता. 
 

वेळापत्रक नाही 
एस. बी. दिल्लीवाले : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुडईअर टायर येथे जाण्यासाठी सिडको बसस्थानकावर आलो; मात्र अर्धा तास उलटूनही बस आली नाही. बससेवा अत्यंत चांगली आहे; मात्र बस केव्हा येणार, याची माहिती मिळत नाही. सांगण्यासाठी कुणी कर्मचारीही जागेवर नाही. 

शेवटी पायीच निघाले

शेख नवाब (हर्सूलमधील प्रवासी) शहागंजहून सकाळी आठ वाजता चालत साडेनऊपर्यंत हर्सूलला पोचलो. परत जाण्यासाठी दहापासून सिटी बसची वाट पाहतोय. एक सिटी बसवाला थांबला. पण कलेक्‍टर ऑफिसकडे जायला 14 नंबर बस मागून येत असल्याचे सांगत निघून गेला. रिक्षाला 30 रुपये देण्यापेक्षा पोटभर खाईन. अडीच तास झाले आता पायीच निघतो. 


खासगी वाहतूकदारांशी साटेलोटे 
अशोक खरात :
बसचालकांचे खासगी वाहतूकदारांशी साटेलोटे असल्याने बससेवा चांगली चालवली जात नाही. चालक-वाहकांना कलेक्‍शनवर (व्यवसायानुसार) वेतन दिले पाहिजे. फिक्‍स वेतन असल्याने बस तोट्यात गेली तरी काय फरक पडतो, अशी बेफिकीर वृत्ती आहे. 
 
बस बाहेरूनच गेली 
वसंतराव पवार : अर्ध्या तासापासून बसची वाट पाहत आहे. बस येत नाही, कुणी माहितीही देत नाही. माहितीच्या कक्षात काही तरी तपासणी सुरू आहे. एक बस आली होती; मात्र ती टीव्ही सेंटरमार्गे रेल्वेस्टेशन होती. ती न थांबताच निघून गेली. 
 
बससेवा लोकाभिमुख करावी 
रूपेश दगडिया : शहर बससेवा चांगली आहे; मात्र एसटीचे चालक-वाहक शहर बससेवेकडे अधिक लक्ष देत नाहीत. वेळापत्रकानुसार बस धावत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. नाइलाजाने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com