
राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले त्याचबरोबर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, दोनदा खासदार तसेच राज्यात मंत्रीमंडळात विविध महत्वाच्या पदावर काम केलेले आणि सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण नांदेडला गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून आहेत.
नांदेड - राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले त्याचबरोबर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, दोनदा खासदार तसेच राज्यात मंत्रीमंडळात विविध महत्वाच्या पदावर काम केलेले आणि सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण नांदेडला गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नांदेडमध्ये पहिल्यांदाच इतके दिवस थांबलेले अशोक चव्हाण अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत कोरोनाविरुद्धची लढाई मोठ्या हिंमतीने लढत आहेत.
पालकमंत्री अशोक चव्हाण मागील ता. १८ मार्चपासून नांदेडला ठाण मांडून बसले आहेत. कोरोनाने मुंबई, पुणे, नागपूर या शहरांसह राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला असताना नांदेड जिल्हा ता. २२ एप्रिलपर्यंत कोरोनामुक्त ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु दुर्देवाने शुक्रवारी (ता. २२) नांदेडमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला आणि त्यानंतर रविवारी (ता. २६) एक रुग्ण सापडला. तरी देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाविरुद्धची त्यांची लढाई सुरुच आहे. दररोज प्रशासनाच्या बैठका घेवून त्यांना वेगवेगळया सूचना आणि मार्गदर्शन करत आहेत.
हेही वाचा - नांदेडच्या महापौर, उपमहापौरांची निवडणूक लांबणीवर...
खांद्याला खांदा लाऊन काम
प्रदीर्घ काळ या विषाणूपासून जिल्हा मुक्त ठेवण्यास सर्वांच्या सहकार्याने व प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने त्यांना यश आले होते. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी आतापर्यंत ८८ वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह आमदार अमर राजूरकर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींसह बैठक घेऊन आणि चर्चा करुन नांदेड शहर आणि जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी श्री. चव्हाण पुढाकार घेत आहेत.
शहरासह तालुक्यांना दिल्या भेटी
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्याला भेटी दिल्या. त्याचबरोबर तालुका पातळीवर आढावा घेतला. प्रत्यक्ष भेटी देवून कोरोनास्थितीचा आढावा घेत गरीबांना अन्नधान्याची मदत करण्याचे काम केले. तसेच रेशनकार्ड नसलेल्या गरजवंतांना श्री. चव्हाण यांच्या पुढाकारातून मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार नांदेड जिल्ह्यात होवू नये म्हणून जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद केल्या. तसेच कर्नाटक आणि तेलंगणा या राज्य सीमाही बंद ठेवल्या. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेस परवानगी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. नांदेडला सचखंड गुरुद्वाऱ्यात पंजाबसह अन्य राज्यातून आलेल्या जवळपास तीन हजार यात्रेकरुंना परत पाठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंजाबचे मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन मार्ग काढला आणि त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी मिळवून दिली.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला...कसा ते वाचा...
पालकमंत्र्यांनी हे घेतले महत्वपूर्ण निर्णय
राज्याच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री चव्हाण यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये नांदेड येथून व्हिडीओ कान्फरंसिंगद्वारे त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली. मागेल त्या मजुराच्या हाताला काम व त्यांना कामाचा योग्य दाम मिळण्यासाठी मनरेगातंर्गत कामे हाती घेण्यात आले. उद्योगधंदे व व्यापाराला चालना देण्यासाठी प्राप्तीकरामध्ये (इन्कम टॅक्स) सवलतीची मागणी केली. त्यासोबतच थकीत हप्त्यांवरील व्याज माफ करावे, अशा सूचना केली. लॉकडाऊनमुळे राज्यातील व्यापार, उद्योग व शेती विषयक कामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्त्यांची कामे तसेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणारी रस्ते, इमारती, पूल, धरणे, कालवा आदींची कामे हाती घेण्याच्या सूचना केल्या. राज्यातील स्थावर मालमत्ता खरेदी विक्री पूर्ववत करुन ऑनलाईन नोंदणी करणे, जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विषयक कामासाठी २५ टक्क्यांपर्यंतचा निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित वेतन तसेच होमगार्ड यांचे मानधन तत्काळ अदा करण्यास सांगितले. स्वयंसेवी संस्थामार्फत विविध जिल्ह्यामध्ये कम्यूनिटी किचन सुरु आहे. ही व्यवस्था अशीच निरंतर व विना व्यत्यय सुरु रहावी, यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनाने या संस्थांना एफसीआय मार्फत धान्य उपलब्ध करुन द्यावे. ग्रामीण भागातील व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या उद्योगातील कामगारांची निवासी व आरोग्य विषयक व्यवस्था संबंधीत उद्योजकांकडून करणे शक्य आहे, अशा ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
हे संकटसुध्दा लवकरच टळेल
कोरोनामुळे घाबरुन न जाता आलेल्या संकटाला समर्थपणे तोंड देणे हाच एकमेव मार्ग आपल्यापुढे आहे. अनेक जिल्ह्यामध्ये या विषाणुने घातलेला धुमाकूळ पाहता नागरिकांनी आता अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नांदेड जिल्हा हा संत महात्मे व पुण्यात्मांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या पवित्र नांदेड शहर व जिल्ह्यावर आलेले हे संकटसुध्दा लवकरच टळेल व आपण पुन्हा एकदा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून पुढे येवू. नागरिकांनी या संकटाला न घाबरता समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रशासनाने निर्गमीत केलेल्या वेगवेगळया सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व घरातच राहावे.
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.