esakal | तुळजाभवानी मंदिरात भाविकांविना गुढीपाडवा
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरावर बुधवारी उभारलेली गुढी. (दुसऱ्या छायाचित्रात) तुळजाभवानी मातेची सालंकृत मूर्ती.

परंपरेप्रमाणे बुधवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर तुळजाभवानी मातेला महावस्त्राचा पेहराव करण्यात आला. दागिने घालून देवीसमोर खडाव ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसहाला महंतांच्या उपस्थितीत गुढी उभी करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिरात भाविकांविना गुढीपाडवा

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात बुधवारी गुढीपाडवा साजरा झाला. मंदिराच्या मुख्य कळसाखाली सकाळी गुढी उभारण्यात आली. देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव करण्यात आला.

मंदिरात पारंपरिक पद्धतीने, विविध कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा होतो. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद आहे. मंदिराच्या स्थापनेपासून यंदा प्रथमच पुजारी, भाविकांविना हा सण साजरा झाला, असे जाणकार सांगतात. 
परंपरेप्रमाणे सकाळी अभिषेक झाला. त्यानंतर देवीला महावस्त्राचा पेहराव करण्यात आला. दागिने घालण्यात आले. देवीसमोर खडाव ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसहाला महंतांच्या उपस्थितीत गुढी उभी करण्यात आली. मंदिर परिसर मात्र निर्मनुष्य होता. 

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

नैवेद्य नाहीत 
शहरातील बहुतांश नागरिक, पुजाऱ्यांतर्फे देवीला दररोजच नैवेद्य असतात. साडेतीन मुहूर्तांवर गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षयतृतीयेदिनी अनेक नागरिकांकडून नैवेद्य असतात. मंदिर बंद असल्याने मंदिरात नैवेद्य गेले नाहीत. 

गुढीपाडव्याच्या सणावर निरूत्साह 
उमरगा : दरवर्षीप्रमाणे येणारा गुढीपाडव्याचा सण आला आणि कोरोनाचा भितीने निघून गेला. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेल्या या सणादिवशी बहुतांश लोकांना गोडधोड खायला मिळाले नाही. संचारबंदी दरम्यान किराणा, भाजीपाला विक्रीसाठीची वेळेची नेमकी सूट किती याबाबत संभ्रमावस्था आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी बाजारपेठेत असलेली किराणा दुकानासमोरील गर्दी पोलिसांनी हुसकावल्याने नागरिक, व्यावसायिकांची धावपळ उडाली. दरम्यान, किराणा दुकान चोवीस तास सुरू राहिल, भाजी विक्री गल्लोगल्लो फिरण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

गुढीपाडवा सण बुधवारी असल्याने काही नागरिक बाजारपेठेत साखरेच्या गाठी, फुलांचे हार, किराणा साहित्य खरेदीसाठी आले होते. किराणा दुकान बारापर्यंत सुरू राहिल असे सांगण्यात आले होते. मात्र दुकानासमोरील गर्दी पाहुन पोलिसांनी नागरिकांना पळविले तर दुकानदारांना बंदचे आवाहन केले. पोलिसांना नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी गर्दी नको आहे, पण नागरिकांमध्ये समयसूचकता अथवा जागरूकता नसल्याने पोलिसांना अचानक निर्णय घ्यावा लागत आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या मूहुर्तावर बुधवारी होणारे अनेक शुभ कार्यक्रम रद्द करावे लागले. नवीन भूखंड रेखांकनाचा शुभारंभ, वास्तूशांती, वधू-वर स्थळ पाहणी आणि नवीन व्यवसायाचा शुभारंभ असे कार्यक्रम रद्द करावे लागले. घरोघरी गुढी उभारण्यात आली, मात्र नागरिकांमध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता. दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची वाताहत होत आहे, त्यांच्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटनेकडून पुढाकार घेण्याची गरज आहे. 

अनेक गावात उभारले भगवे ध्वज 
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व छावा संघटनेने पुढाकार घेतल्याने भगव्या ध्वजाची गुढी उभारली जात आहे. यंदा अनेक गावात भगव्या ध्वजाची गुढी उभारली. कोराळ, गुंजोटी, कोरेगाव, माडज, मळगी, मळगीवाडी, तुरोरी, गुरुवाडी, माने गोपाळ आदी गावात अनेकांच्या घरावर भगवे ध्वज दिसत होते.