esakal | मराठवाड्यात गारपिटीची शक्यता, शेतमाल ठेवा सुरक्षित, दुहेरी संकट आलंय
sakal

बोलून बातमी शोधा

weather

एकीकडे कोरोनामुळे घराबाहेर पडणे अशक्य असल्याने भाजीपाला, टरबूजसारखा शेतमाल पडून राहिल्याचे चित्र मराठवाड्यात आहे, तर दुसरीकडे हवामान विभागातर्फे मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे. ​

मराठवाड्यात गारपिटीची शक्यता, शेतमाल ठेवा सुरक्षित, दुहेरी संकट आलंय

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : एकीकडे कोरोनामुळे घराबाहेर पडणे अशक्य असल्याने भाजीपाला, टरबूजसारखा शेतमाल पडून राहिल्याचे चित्र मराठवाड्यात आहे, तर दुसरीकडे हवामान विभागातर्फे मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उभे राहिले आहे. 

हेही वाचा- हातावर शिक्का दिसला अन, नागरिकांची धावपळ सुटली

हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार २५ ते ३१ मार्चदरम्यान राज्यभर अवकाळी पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह गारपिटी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

काढणी केलेले पीक ठेवा झाकून 
सद्यःपरिस्थितीत ज्वारी पिकाची काढणी, मळणी झालेली आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, परंडा, लोहारा तालुक्यातील काही परिसरात ज्वारी पिकाची काढणी होऊन पीक शेतात आहे. यासोबतच हळद, कांदा, हरभरा, जवस आदी पिकांचीही काढणी झाली असून, काही ठिकाणी हा शेतमाल शेतात आहे. त्यामुळे या पिकांना गारपिटीपासून वाचविण्यासाठी झाकून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुढील पाच दिवसांत विजांचा कडकडाट, पाऊस, गारपीठ तसेच २४ आणि २५ मार्च या दोन दिवसांत मराठवाड्यात जोराचा वारा, वादळी वारा असणार आहे. तसेच या पाच दिवसांत पाऊस असणार आहे. तिसरा आणि चौथ्या दिवशी नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद हे तीन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत पाऊस असेल. 
- कैलास डाखोरे, हवामान विभाग, परभणी कृषी विद्यापीठ. 

मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता आहे. उर्वरीत जिल्ह्यात ढगाळ वातावरण तसेच तुरळक पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी जनावरे निवाऱ्याला बांधावीत, तसेच काढणी केलेला शेतमाल योग्य ठिकाणी ठेवावा. 
-पंजाब डख, हवामान अभ्यासक 

हे वाचलंत का?- माणुसकीची परीक्षा - कोरोनाच्या संशयाने मुलाचा अंत्यविधी रोखला