निम्म्या लातूरच्या ओल्या कचऱ्यापासून बनतोय खत, चार ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने सुरू आहे निर्मिती

हरी तुगावकर
Thursday, 26 November 2020

लातूर महानगरपालिका आता लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी सरसावली आहे. केवळ कचरा गोळा करून कचरा डेपो येथे पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीने प्रक्रिया करण्यावर महापालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे.

लातूर : महानगरपालिका आता लातूर शहराला कचरामुक्त करण्यासाठी सरसावली आहे. केवळ कचरा गोळा करून कचरा डेपो येथे पाठविण्यावर न थांबता त्यावर सुनियोजित पद्धतीने प्रक्रिया करण्यावर महापालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे. याकरिता विकेंद्रित पद्धतीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे चार प्रकल्प शहरात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या माध्यमातून निम्म्या शहरातील कचरा प्रभागातच कुजवून खत निर्मिती केली जात आहे. परिणामी डेपोवर जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दररोज स्वच्छता केली जात आहे. घरोघर जाऊन नागरिकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करून स्वीकारला जात आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी विकेंद्रित पद्धतीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.

त्यापैकी प्रभाग क्रमांक ५ मधील महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या खत निर्मिती प्रकल्प मागील ३४ महिन्यांपासून अविरतपणे कार्यरत आहे. शासकीय कॉलनी व फ्रुट मार्केट येथील प्रकल्प काही कारणाने बंद झाले होते परंतु ते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद चौक येथील प्रक्रिया प्रकल्प नव्याने सुरू करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो कुजवला जात आहे. त्यापासून खत निर्मिती केली जात आहे.
शहरातील एकूण नऊ प्रभागात निर्माण होणाऱ्या सुमारे २५ टन ओल्या कचऱ्यावर या माध्यमातून दररोज प्रक्रिया होत आहे. अर्ध्या लातूर शहरातील कचरा शहरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती सुरू आहे. यामुळे कचरा डेपोवर जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half Latur Wet Garbages Make Into Fertilizer Latur News