esakal | सूर्याला खळं, दुष्काळाचं चिन्ह?
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : सूर्याभोवती शनिवारी दिसू लागलेले तेजोवलय. (छायाचित्र : मोहम्मद इम्रान)

अगोदरच अवर्षणग्रस्त असलेल्या या भागात सूर्याला खळं पडणं म्हणजे दुष्काळाचंच चिन्ह असल्याचं मत खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सूर्याला खळं, दुष्काळाचं चिन्ह?

sakal_logo
By
संकेत कुलकर्णी

औरंगाबाद : सूर्याभोवती अचानक इंद्रवज्रासारखं तेजोवलय शनिवारी (ता. 24) सकाळी साडे अकरा वाजेपासून दिसू लागलं आणि दोनेक तास ते हळूहळू विस्तारताना दिसत राहिलं. होय, सूर्याला खळं पडलं होतं. अगोदरच अवर्षणग्रस्त असलेल्या या भागात हे खळं दिसणं म्हणजे दुष्काळाचंच चिन्ह असल्याचं मत खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

पृथ्वीपासून सुमारे 9 किलोमीटर उंचीवर कमी घनतेच्या विरळ ढगांमध्ये थंड वातावरणामुळे झालेल्या स्फटिक तयार होतात. त्यावरून सूर्याचे किरण परावर्तित होतात आणि पाहणाऱ्याच्या नजरेशी त्याचा 22 अंशाचा कोन तयार होऊन तेजोवलय दिसू लागते. याला शास्त्रीय परिभाषेत HALO म्हणतात, अशी माहिती खगोलतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. पावसाळी दिवसांत सहसा हे तेजोवलय दिसते. मात्र, सूर्याला खळं पडल्यास दुष्काळ पडतो, अशी ग्रामीण भागात वदंता असते. यात काही प्रमाणात तथ्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

पावसाचे ढग हे पृथ्वीपासून साधारण 200 ते 300 मीटर उंचीवर असतात. मात्र तेजोवलय परावर्तित होते, तेव्हा ते ढग अतिशय विरळ आणि सुमारे 8 ते 9 किलोमिटर उंचीवर असतात. आतापर्यंतच्या निरीक्षणांनुसार असे विरळ ढग असतील, तर ते कमी पावसाचे संकेत समजले जातात. वातावरण इतके विरळ असणे म्हणजे नजीकच्या भविष्यात पर्जन्यमान चांगले नसल्याचीच चिन्हे असल्याचे श्री. औंधकर म्हणाले. 

loading image
go to top