दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

विकास गाढवे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करत नसल्याने दिव्यांगांना निधीत कधीत वाटा मिळत नाही. येथील दिव्यांगांनी मात्र, एकत्र येऊन निधीसाठी सहा महिन्यापासून लढा दिला. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले असून मुरूड (ता. लातूर) येथील ग्रामपंचायतीने शुक्रवारी (ता. 17) त्यांच्या वाट्याचा नऊ लाख 31 हजार 112 रूपयाचा निधी 104 दिव्यांगांच्या खात्यावर जमा केला आहे.

यानिमित्ताने राज्यात पहिल्यांदाच दिव्यांगांनी विकास निधीत वाटा मिळवला असून फटाके फोडून व पेढे वाटून दिव्यांगांनी हा आनंद साजरा केला. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पूर्वी हे प्रमाण तीन टक्के होते. मागील वर्षात सरकारने हे प्रमाण पाच टक्के केले आहे. सरकारचे आदेश असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांच्या वाट्याचा निधी अन्यत्र खर्च केला जातो. दिव्यांगांना मात्र, त्यांच्या जुजबी साहित्य खरेदीसाठी दुसरीकडे हात पसरावे लागतात.

आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने या निधीसाठी लढा सुरू केला आहे. त्याची सुरवात राज्यात पहिल्यांदा मुरुड येथे करण्यात आली. जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या मुरुड  ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांनी त्यांच्या वाट्याचा निधी मागितला. मात्र, त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. शेवटी प्रहार संघटनेने ठिय्या आंदोलन केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. मुरुडचे सरपंच अभयसिंह नाडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन दिव्यांगाच्या वाट्याचा चौदा लाखाचा निधी निश्चित केला. त्यानंतर शुक्रवारी  प्रत्येक दिव्यांगाला आठ हजार 953 रूपयाप्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले. या निधीतून साहित्य खरेदी करून दिव्यांगांना त्याची पावती दोन महिन्याच्या आता ग्रामपंचायतीला सादर करावी लागणार आहे. अशा निधीचे वाटप करणारी राज्यातील मुरूड ही एकमेव ग्रामपंचायत असल्याचा दावा ग्रामविकास अधिकारी एस. आय. शेख यांनी करून उर्वरित निधीही लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

दिव्यांगांच्या एकजुटीचा विजय
हा दिव्यांगांच्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रहारचे शहराध्यक्ष विनोद पुदाले यांनी सांगितले. निधीसाठी जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, उद्धव जाधव, मेघराज अंधारे, राजाबाई पुजारी, वैशाली डांगे, योगेश डांगे, रोहित पांचाळ, प्रकाश शिंदे, शैलेंद्र कोंडेकर, चंद्रकांत देशमाने यांच्यासह दिव्यांगांनी पुढाकार घेतला. दिव्यांगांना त्यांच्या लढ्यासाठी अमर नाडे, अमर मोरे, महेश कणसे, अनंत कणसे व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.   

Web Title: handicapped got part in development fund