हर्सूल, बीड बायपासवरही कचरा प्रक्रिया प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सुक्‍या कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर 
ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात असली तरी सुक्‍या कचऱ्याचा प्रश्‍न मात्र गंभीर बनला आहे. एका सिमेंट कंपनीने सुक्‍या कचऱ्याची मागणी केली होती, दोन ट्रक कचरा देण्यातही आला, त्यानंतर सुका कचरा घेण्यासाठी कोणी समोर आले नाही.

औरंगाबाद - चिकलठाणापाठोपाठ हर्सूल सावंगी, बीड बायपास परिसरातही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जागांची चाचपणी करण्यात येत आहे. दरम्यान, चिकलठाणा येथील नागरिकांची प्रभारी आयुक्त नवल किशोर राम भेट घेणार असून, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

शहरातील कचराकोंडीचे चित्र ५१ व्या दिवशीही कायम आहे. पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर रोडवर, आकाशवाणी चौक येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. बसस्थानकासमोरील कचऱ्यावर औषधी फवारणी करण्यात आली होती. त्यामुळे तेथे खत तयार झाले आहे. सेंट्रल नाका येथील कचऱ्याचे ढीगही कमी झाले आहेत. मात्र अद्याप जुन्या शहरातील प्रभाग एक, दोन व तीनमधील कचरा कायम आहे.

या ठिकाणी ओला-सुका कचरा वेगवेगळा केला जात नसल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदीच्या निविदा काढण्यात आल्याने जागा निश्‍चित करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने घेतला आहे. या निर्णयाविरोधात नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जागेचा निर्णय घेण्याचे समितीला अधिकार दिले असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भातील याचिका निकाली काढली. तरीही नागरिकांचा विरोध मात्र कायम आहे. त्यामुळे नवल किशोर राम यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हर्सूल सावंगी व बीड बायपास परिसरात जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सेंट्रल नाका येथे कॅनपॅक कंपनीने सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसविले आहे. याच आकाराचे मशीन हर्सूल सावंगी व बीड बायपास परिसरात लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: harsul beed bypass garbage process project