रंगांची बरसात आणि जावयाची गाढवावरून वरात

दत्ता देशमुख
गुरुवार, 21 मार्च 2019

धुलीवंदनाच्या दिवशी गावातील एकाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची निजाम काळात सुरु झालेली परंपरा तालुक्यातील विडा येथे गुरुवारी (ता. 21) हर्षोल्हासात पार पडली.

बीड : धुलीवंदनाच्या दिवशी गावातील एकाची गाढवावरुन मिरवणुक काढण्याची निझाम काळात सुरु झालेली परंपरा तालुक्यातील विडा येथे गुरुवारी (ता. 21) हर्षोल्हासात पार पडली. यंदा विड्याच्या तरुणांना जावयाच्या शोधा येवढीच कसरत गाढव शोधताना झाली हे विशेष. यंदा गावातील सावळराम पवार यांचे शिंधी (ता. केज) येथील जावई बंडू पवार यांना यंदाच्या गदर्भ सवारीचा मान मिळाला. सुरुवातीला नानू करणारे बंडू पवार नंतर मेहुण्यांच्या आनंदात ऐवढे समरस झाले कि मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनीही डॉल्बीच्या गाण्यांवर ठेका धरला.  

जावई म्हणजे सर्वात लाडके आणि जवळचे नाते. जावयाचा हट्ट पुरवायचा आणि त्यांची खातीरदारी करताना सासुरवाडीवाल्यांच्या नाकी नऊ येतात. मात्र, विड्याच्या जावयाला मेहूण्यांचाच गाढवावर बसाचया हट्ट पुर्ण करावा लागतो. याची सुरुवात झाली अशी. विडा (ता. केज) हे निझाम राजवटीत जहागीरदारीचे गाव होते. साधारण 82 वर्षांपूर्वी तत्कालिन जहागिरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई ऐन धुलीवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. त्यावेळच्या तरुणांनी मालकाच्या (जहागिरदारांच्या) जावयाची चेष्टेत गाढवावरुन मिरवणूक काढली आणि तेव्हापासून ही गावचीच परंपरा झाली.

विड्याच्या सर्वच पिढ्यातील तरुणांनी ही परंपरा अखंडपणे सुरु ठेवली आहे. विशेष म्हणजे, जावई मिरवणुकीवरुन एकदाही साधी कुरबुर देखील झालेली नाही. सर्वच जाती - धर्मांच्या मंडळींचा मिरवणुकीत सहभाग आणि सर्वच घटकांच्या जावयांची आतापर्यंत मिरवणुक काढून विडेकरांनी यातून सामाजिक आणि जातीय सलोखाही जपला आहे. गावातील कोणाही एकाच्या जावयाला पकडून आणून त्याला तुटक्या चपलांचा हार घातलेल्या सजविलेल्या गाढवावरुन मिरवणूक निघते. मिरवणुकीसेमोर ढोल - ताशा आणि डॉल्बीच्या संगीतावर थिरकणारे तरुण आणि घरांच्या गच्चीवरुन महिलांकडून रंगाची उधळण होत असते. गावातील प्रमुख रस्त्यांवरुन ही मिरवणुक ग्रामदैवत मारुतीच्या पारावर पोचल्यानंतर ग्रामस्थांनी जमविलेल्या लोकवर्गणीतून जावयाल मनपसंत कपड्यांचा आहे केला जातो. 
दरम्यान, गाढवावर बसायचे म्हणजे कोणीही नकोच म्हणणार पण एकदा विडेकर मेहुण्यांच्या तावडीत सापडलेल्या जावयाला गुमान गाढवावर बसावे लागते. आयुष्यभर सासुरवाडीकरांकडून सरबराई करुन घेतल्याच्या बदल्यात मेहुण्यांचा येवढा हट्ट तर पुरवावाच लागतो. 

विडा गावाची तशी परिसरात जावईवेडे गाव अशीच ओळख आहे. गावातील मुलींशीच विवाह केलेले गावजावई, घरजावई आणि काही व्यवसाय वा नोकरी निमित्त सासुरवाडीतच स्थिरावलेल्या जावयांची संख्या दोनशेच्या घरात आहे. मात्र, धुलीवंदनाची चाहुल लागताच ही जावई मंडळी भूमिगत होते. या भूमिगत झालेल्या किंवा दुसऱ्या एखाद्या जावयाला शोधून आणून ही परंपरा पुढे चालविली जाते. दरम्यान, यंदाच्या मिरवणुकीसाठी जावई शोधण्यासाठी तरुणांचे चार पथके बुधवारी (ता. 20) रात्रीच वाहने घेऊ विविध ठिकाणी रवाना झाले. मात्र, सासुरवाडीची परंपरा माहित असल्याने अनेक जावयांनी अगोदरच भूमिगत होण्याचा मार्ग अवलंबिला होता. तसे, मानकरी ठरलेले बंडू पवार देखील परागंदा होण्याच्या तयारीत असतानाच विड्याच्या तरुणांनी त्यांना घेराव घालून गाडीत बसविले. सुरुवातीला नको अशा विनवण्या कामी येत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मग होकार दिला.

मेहुण्यांच्या आनंदात तेही ऐवढे समरस झाले कि मिरवणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनीही डॉल्बीच्या गाण्यांवर ठेका धरला.  बंडू पवार यांना उपसरपंच बापूसाहेब देशमुख, भैरवनाथ काळे, शहाजी घुटे, राहूल छाजड, हरी देव यांच्या हस्ते कपड्यांचा आहेर करण्यात आला. 

गाढव शोधताना नाकी नऊ
दरम्यान, पूर्वी गावात मोठ्या प्रमावर गाढवं असत. झाप, दुरड्या बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करणो मंडळी फोक वाहतूक करण्यासाठी गाढवं पाळत. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय बंद झाल्याने गाढवं पाळणंही बंद झाल. तरीही पारंपारिक ओळख म्हणून जीवन गायकवाड यांच्याकडे अनेक वर्ष गाढव होती. मात्र, अपघाताने त्यांचे गाढवही वारल्याने यंदा जावयाईतकीच गाढव शोधण्याची कसरत विडेकरांना करावी लागली. शेवटी हिवरापहाडी येथून भाड्याने गाढव आणावे लागले. 

Web Title: have you ever seen this kind of celebration of Holi