‘या’ शहरात हॉकर्स झोन समिती कागदावरच !

‘या’ शहरात हॉकर्स झोन समिती कागदावरच !

परभणी : न्यायालयाचे निर्देश असतांनाही काही वर्षांपासून महापालिका हॉकर्स झोन तयार करण्यासाठी ना समिती गठित करू शकली ना हॉकर्स ना शिस्त लावू शकली. हॉकर्स झोनच्या निर्मितीसाठी महापालिका कमालीची उदासीन असल्याचे चित्र असून त्यामुळे हातगाड्यांनी बाजारपेठ व्यापल्याने नागरिकांना मात्र, प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईत रस्त्यावरील हॉकर्स व काही पक्षांमध्ये राडा झाल्यानंतर न्यायालयाने सर्व महापालिकांना हॉकर्स झोन निर्माण करण्याचे आदेश दिले होते. या घटनेलादेखील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. तेव्हापासून येथील महापालिकेने हॉकर्स झोन तयार करण्याचे प्रयत्न केले. परंतु, अद्यापही त्याला यश आलेले नाही. केवळ हॉकर्स झोन तयार करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आल्याची माहिती असून हॉकर्स प्रतिनिधी निवडण्याची कार्यवाही मात्र, अद्यापही झालेली नसल्यामुळे व त्या बाबत उदासीनता असल्यामुळे ना प्रतिनिधींची निवड झाली, ना झोनची. काही महिन्यांपूर्वी शहरातील हॉकर्स ऑनलाइन नोंदणी केली जाणार असल्याचे पालिकेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. परंतु, ते कामदेखील ठप्प असल्याचे समजते. त्यामुळे पालिकेला वादग्रस्त विषयांना हात घालयचाच नाही का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाहतुकीला अडथळा
शहरात बाजारपेठेतील सर्व सर्व मुख्य रस्त्यांवर हातगाडेवाल्यांचा उच्छाद आहे. पालिका असो की शहर, वाहतूक शाखेची भूमिका या बाबत संशयास्पद असून कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय वाहतुकीला प्रचंड अडथळा ठरणाऱ्या या हॉकर्सवर कधीच मोठी कारवाई होत नाही. अधूनमधून हातगाडे हाकलले जातात. परंतु, पथकांनी पाठ वळवताच पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.

प्रमुख रस्त्यांना घेराओ
रेल्वेस्थानक-बसस्थानकापासून निरज हॉटेल, डनलप रोड, आर. आर. टॉवर अष्टभूजा मंदिर परिसर, गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार, सरकारी दवाखाना, कच्छी बाजार, जनता मार्केट, ग्रॅन्ड कॉर्नर, जुनी पोलिस चौकी, अपना कॉर्नर, सुभाष रोड, नानलपेठ, जिंतूर रोडवर सर्व कार्यालयांच्या संरक्षक भिंती, रस्ते, वसमत रोडवर डॉ. वसंतराव नाईक यांचा पुतळा, राजगोपालाचारी उद्यान, शिवाजी महाविद्यालयासमोर, आर. आर. पेट्रोलपंप, भरोसे पेट्रोल पंप, काळी कमान, खानापूर फाटा आदी परिसरात हजारोंच्या संख्येने हातगाडे रस्त्यावर, रस्त्याच्या मध्ये, दुतर्फा लागलेले असतात. वास्तविक हातगाडेवाल्यांचे काम फिरून व्यवसाय करण्याचे काम असतांना रस्त्यावरच त्यांना जागा पक्क्या केल्या आहेत.

हेही वाचा - शेतीचा फेर नावावर करण्यासाठी लाचेची मागणी

नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप
बाजारपेठेत चारचाकी वाहन घेऊन जाणे म्हणजे दिव्यच. परंतु, दुचाकी वाहनावर किंवा पायी जाणेही अतिशय मनस्तापाचे झाले आहे. दुतर्फा असलेल्या हातगाड्यांमधून वाट काढतांना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागते. पुन्हा गाडे हटवा म्हणण्याची सोय नाही. कुणी म्हटलेच तर काही मुजोर हॉकर्स एकत्र येऊन वाद घालतात, असे चित्र वारंवार दिसून येते. परंतु, ते महापालिका अथवा शहर वाहतूक शाखेला मात्र दिसत नसल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com