आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रिया कक्ष, सेवा सत्राच्या इमारतीला गळती

बाबासाहेब ठाेंबरे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

हतनूर  (ता. कन्नड)  परिसरात गेल्या  आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागाच्या खोलीसह, शस्त्रक्रिया कक्ष आणि नवीन बांधकाम झालेल्या आरोग्य सेवा सत्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे.

हतनूर ( जि.औरंगाबाद) : हतनूर  (ता. कन्नड)  परिसरात गेल्या  आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभागाच्या खोलीसह, शस्त्रक्रिया कक्ष आणि नवीन बांधकाम झालेल्या आरोग्य सेवा सत्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे.

विश्रामगृहसुद्धा शेवटची घटका मोजत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बाजूलाच आरोग्य सेवा सत्राच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. सद्यःस्थितीत या इमारतीला पूर्णतः पाण्याची गळती लागलेली दिसत आहे. याचबरोबर येथे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सहा विश्रामगृहांपैकी काही विश्रामगृहांची पडझड झाली असून राहण्यायोग्य नसल्याने रिकामेच पडून असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी दिली आहे.

दुसरीकडे केंद्रातील औषधनिर्माण अधिकाऱ्यांची जागा रिक्त असल्याने परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत वर्ष 1986पासून रुग्णसेवेसाठी कार्यान्वित आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र हे औरंगाबाद-धुळे महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे येथे चोवीस तास परिसरातील शेकडो विविध रुग्णांची ये-जा असते. गत आठवड्यात व चार दिवसांपासून परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे आरोग्य केंद्राच्या इमारतीतील सभागृह, शस्त्रक्रिया रूम, आरोग्य सेवा सत्राची इमारत, आंतररुग्ण व बाह्य रुग्ण विभागात पावसामुळे छताच्या गळतीने काही काळ पाणी साचते.

यामुळे येथे आलेल्या अनेक रुग्णांची व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून, या ठिकाणीच्या इमारतीची दुरुस्ती तसेच या ठिकाणी नवीन इमारत होणे अपेक्षित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र येतात. त्यात हतनूर, शिवराई, जैतापूर, देवळाना, देवगाव रंगारी यांचा समावेश असून एकूण 26 ते 27 गावांतील रुग्णांची जबाबदारी येथील आरोग्य केंद्रावर आहे. परंतु, आजघडीला रिक्त असलेल्या जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याने, रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, परिचर जागेतील रिक्त पदे लवकरात लवकर आरोग्य विभागाकडून भरण्यात यावीत जेणेकरून रुग्णांची होणारी गैरसोय थांबेल, असे मत ग्रामपंचायत सदस्य कैलास अकोलकर, अंबादास जगताप, शिवकांत मोहिते यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Centre In Bad Condition