हेल्थ क्‍लबच्या नावाखाली हायप्रोफाईल कुंटणखाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

औरंगाबाद - हेल्थ क्‍लबच्या नावाखाली लपूनछपून सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घातला. यात तीन महिला, ग्राहक व दलाल दांपत्याला पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जटवाडा रस्त्यावरील ईडन प्लाझा इमारतीत झाली.

औरंगाबाद - हेल्थ क्‍लबच्या नावाखाली लपूनछपून सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घातला. यात तीन महिला, ग्राहक व दलाल दांपत्याला पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जटवाडा रस्त्यावरील ईडन प्लाझा इमारतीत झाली.

संजय त्र्यंबक कापसे, त्याची पत्नी ममता कापसे (दोघेही रा. ईडन प्लाझा बिल्डिंग, जटवाडा रोड) अशी दलाल दांपत्याची, तर मधुकर नारायणराव पवार (रा. प्रतापगड सोसायटी, सारा वैभव, जटवाडा रोड) असे अटक केलेल्या ग्राहकाचे नाव आहे. जटवाडा रोडवरील ईडन प्लाझा इमारतीत हायप्रोफाईल कुंटणखाना सुरू होता. ही माहिती गुन्हे शाखेला आठ दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र, त्यांनी गत सात दिवस या इमारतीवर; तसेच ये-जा करणाऱ्यांवर पाळत ठेवली. कापसे दांपत्य कुंटणखान्यात सक्रिय असल्याचे समजल्यानंतर सोमवारी सायंकाळी एका व्यक्तीला कुंटणखान्यावर डमी ग्राहक म्हणून पाठविले. तो ग्राहक असल्याचे समजून त्याच्याशी आर्थिक व्यवहारही झाला. यानंतर त्याने पथकाला इशारा करताच एकाच वेळी दोन खोल्यांत पथकाने छापा घातला.

यात पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर ग्राहक पवारसह दलाल, कापसे दांपत्याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सात ते आठ मोबाईल, रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त केले. हेल्थ क्‍लबच्या नावाखाली कुंटणखाना सुरू होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय पवार, जमादार शिवाजी झिने, दत्ता सांगळे, शिवाजी कचरे, पचरंडे, रेखा चांदे यांनी केली.

Web Title: health club sex racket in aurangabad