जालन्यात चार दिवसांत सव्वादोन लाख नागरिकांचे सर्वेक्षण 

उमेश वाघमारे 
Sunday, 12 July 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने मागील चार दिवसांत तब्बल दोन लाख १२ हजार ६०४ नागरिकांचे अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

जालना -  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने मागील चार दिवसांत तब्बल दोन लाख १२ हजार ६०४ नागरिकांचे अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ११ हजार ६७३ नागरिक हे ६० वर्षांपुढील असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग, अस्थमा, मूत्रपिंडाचा विकार, गरोदर मातांची माहिती संकलित केली जात आहे.  

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यात जालना शहरामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याच काळात नगरपालिका, आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी १०५ पथक तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकामध्ये तीन जणांचा समावेश आहे.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

ता. सहा जून ते ता. दहा जून या चार दिवसांमध्ये या १०५ पथकाने घरोघरी जाऊन शहरातील दोन लाख १२ हजार ६०४ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

जालन्यातील सर्वेक्षणात ६० वर्षांपुढील ११ हजार ६७३ नागरिकांची माहिती संकलित झाली आहे. यात उच्चरक्तदाब असलेले चार हजार २६१, मधुमेह असणारे दोन हजार ८०५ जण, कर्करोगाचे ३७, अस्थमाचा आजार असलेले १३९, किडनीविकार आजार असलेले २५ जण आढळून आले आहेत. तर एक हजार २३१ गरोदर माता असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मागील चार दिवसांमध्ये १४३ जणांना सर्दी, खोकला, ताप असल्याचे आढळून आले आहे. सध्या कोरोनासह पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांच्यावरही नगरपालिका लक्ष ठेवून आहे. 

काळजी घेणे होणार सुलभ

दरम्यान, सर्वेक्षणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. यामुळे ६० वर्षांपेक्षा पुढे असलेल्या नागरिकांसह मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीचे अजार असलेल्या नागरिकांची माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी या नागरिकांची अधिक काळजी घेणे सुलभ होणार आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health survey of citizens in Jalna