उजाड घर पाहून हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कळंब (जि. उस्मानाबाद) ः मराठवाड्यातील दुष्काळाला कंटाळून 25 वर्षांपूर्वी तालुक्‍यातील इटकूर गाव सोडून मुकुंद कोकाटे यांनी कोल्हापूर गाठले. सेंटरिंगचा व्यवसाय करून मुकुंद कोकाटे यांनी कदमवाडी येथे स्वत:चे घर बांधले. आठ दिवसांपूर्वी पंचगंगेच्या पूरस्थितीमुळे घर पाण्यात गेल्याने त्यांनी कोल्हापूरपासून हाकेच्या अंतरावर किरायाने घर घेत स्थलांतर केले. मात्र पाऊस ओसरल्याने शुक्रवारी (ता. नऊ) ते आपल्या घराची अवस्था पाहण्यासाठी गेले असता होत्याचे नव्हते झाले. उजाड झालेले घर पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इटकूर गावावर शोककळा पसरली आहे.

कळंब तालुक्‍यातील इटकूर येथील बाबूराव कोकाटे यांना पाच मुले आहेत. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे कोरडवाहू जमिनीत उत्पन्न मिळेल याची शाश्‍वती कमीच. त्यामुळे कोकाटे कुटुंबातील चार भावांनी 25 वर्षांपूर्वी इटकूर सोडून थेट कोल्हापूर गाठले. सेंटरिंगचा व्यवसाय करून तिथेच ते स्थायिक झाले.

चार भावंडांपैकी मुकुंद कोकाटे यांनी कदमवाडी येथे स्वतःचे घर बांधले. मात्र पंचगंगेच्या पूरपरिस्थितीमुळे घर पाण्यात गेले. पाणीपातळी आज-उद्या कमी होईल, अशी आशा होती. मात्र पाणीपातळी वाढल्याने स्थलांतर करावे लागले. कदमवाडीपासून काही अंतरावर घर किरायाने घेतले. परंतु कष्टाने बांधलेल्या घराची काय स्थिती असेल, याची काळजी लागून राहिली. 

भावाच्या मुलीचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. विवाहासाठी लागणारे साहित्यही त्यांच्याच घरात ठेवण्यात आले होते. पूरस्थितीमुळे चारही भाऊ दूर दूर राहण्यास गेले. शुक्रवारी (ता. नऊ) मुकुंद हे सकाळी नऊच्या सुमारास कदमवाडीतील स्वतःच्या घराकडे गेले होते. घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शुक्रवारी कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पूरस्थितीमुळे नातेवाइकांना कोल्हापूरला जाता आले नाही, असे त्यांचे मावसभाऊ अरुण लोंढे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart attack death