उष्णतेने मराठवाड्याची होरपळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

अन्य शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः नांदेड ४४.०, हिंगोली ४३.०, उस्मानाबाद ४४.४, जालना ४३.२, औरंगाबाद ४२.६, बीड ४२.०, लातूर ४२.०.

परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

 २६ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतील पाराही ४२ अंशांपुढे होता. एप्रिलमध्ये परभणीत तापमानाने ४७ अंशांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर ढगाळ हवामानामुळे तापमान ४० ते ४२ अंशांवर स्थिरावले होते. गेल्या दोन  आठवड्यांपासून पारा ४३ अंशांच्या पुढे आहे. गेल्या सोमवारी तापमान ४४.०८ अंशांवर होते. आज त्यात आणखी वाढ झाली. दुपारनंतर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; पण झळा आणि असह्य उकाडा कायम होता.

अन्य शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः नांदेड ४४.०, हिंगोली ४३.०, उस्मानाबाद ४४.४, जालना ४३.२, औरंगाबाद ४२.६, बीड ४२.०, लातूर ४२.०.

हिंगोलीत उष्माघाताचा पाचवा बळी
हिंगोली - शहरातील महात्मा गांधी चौकात आज सकाळी अकराच्या सुमारास ४५ वर्षीय व्यक्‍तीचा मृतदेह आढळला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला.  हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यापासून पारा ४१ ते ४३ अंशांपेक्षा कमी झालाच नाही. उष्माघाताचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वीच आखाडा बाळापूर येथे अनोळखीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात आज तशीच घटना निदर्शनास आली. जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताने पाच बळी घेतले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heat wave in Marathwada