पिकाने डोलणारी शेती झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले

राम काळगे
Wednesday, 21 October 2020

यंदा चांगला पाऊस झाला. दुबार, तिबार पेरणी करून पिकही चांगले आले होते. शेतकऱ्यांच्या आनंदाला भरते आले होते. मात्र एकाच रात्रीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहेत.

निलंगा (जि.लातूर) : यंदा चांगला पाऊस झाला. दुबार, तिबार पेरणी करून पिकही चांगले आले होते. शेतकऱ्यांच्या आनंदाला भरते आले होते. मात्र एकाच रात्रीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहेत. डोळ्यांदेखत त्याचं मातेरं झाल्याचं चित्र पाहवत नाही. पिकाने डोलणारी शेती उद्ध्वस्त होऊन त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. हे चित्र आहे निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्‍याप्रमाणे उपसागरातील चक्रीवादळाचा फटका निलंगा तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही?' संभाजीराजे झाले भावूक.  

तालुक्यातील दहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, तर सात महसूल मंडळात शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा व तेरणा नदीबरोबरच गावागावातील ओढ्याला पूर आला होता. खरीप हंगामातील सर्वाधिक पेरा क्षेत्र असलेले बहुतांश सोयाबीन पिक काढून ठेवून शेतकऱ्यांनी शेतामध्ये गंजी लावून ठेवल्या होत्या. मात्र चक्रीवादळामुळे झाकून ठेवलेल्या गंजी वरचे ताडपत्री उडून गेल्यामुळे रात्रभर झालेल्या पावसात सोयाबीन पूर्ण भिजून गेले आहे. गंजीत पाणी शिरल्यामुळे आता सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. शिवाय नदीच्या ओढ्याच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या हजारो गंजी वाहून गेले आहेत.

त्यामुळे वर्षभर काबाडकष्ट करून महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप हंगामाच्या आशेवरच शेतकऱ्यांची आर्थिक बिस्त असते. त्यामुळे अतिवृष्टीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. अनेक शेतकऱ्यांचे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस संपूर्ण आडवा पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे सध्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून पंचनामे सुरू झाले आहे. आता नुकसान कसे गृहीत धरावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची अपेक्षा लागली आहे.

आमचे घर पाण्यात गेले हो, गोकुळबाईंनी मांडली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत

तहसील व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत विमाकंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी अशी माहिती तालुक्यातील विविध गावांच्या प्रमुख या मार्फत दिली जात आहेत, तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून याबाबत कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचम होणार का अशा संभ्रमावस्थेत शेतकरी आहे. ग्रामीण भागांमध्ये ऑनलाईन तक्रारी विमा कंपनीकडे कराव्या कशाला याबाबतची माहितीही शेतकऱ्यांना नसल्यामुळे तहसील, कृषी, पंचायत समिती व विमा कंपनीकडून संयुक्त सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानीबाबत पंचनामे करण्यासाठी आदेश आल्यामुळे तहसील व कृषी विभागाचे कर्मचारी सध्या पंचनामे करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Damaged Everything, Farmer Dreams Break Nilanga Block