'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो, जगावं कसं बघा आम्ही?' संभाजीराजे झाले भावूक.  

sanbhajiraje bhosale.jpg
sanbhajiraje bhosale.jpg

निलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही?' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी काय उपयोग हाय. कधी दुष्काळ कधी अतिपाऊस यानं जीव वैतागलाय, अशी व्यथा निलंगा तालुक्यातील शेतकर्यांनी संभाजीराजे छत्रपती भोसले यांच्यासमोर मांडली.

तालुक्यातील बोरसुरी व सोनखेड येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती गेले होते. शेतकर्यांची ही परिस्थिती आणि मांडलेल्या व्यथा ऐेकून राजेही भावूक झाले. या संभाषणाचा व्हिडिओ संभाजीराजे यांनी ट्विट केला असून यावर सरकार जागे होणार का, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

निलंगा तालूक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून सोनखेड येथे तेरणा नदीने आपला प्रवाहच बदलला आहे. शिवाय छत्रपती संभाजीराजे भोसले यानी कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोरसुरी गावच्या शिवारातून जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन या पात्रातील बंधाऱ्यावर जावून पाहणी केली. तेरणा नदीने आपली वाट बदलली आहे. पात्राच्या पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे व राजेची वाट पाहत बसले होते. नुकसान झालेली पाहणी करण्याठी येताच पाण्याचा प्रवाह सध्या सुरू असल्यामुळे त्यांना संभाजीराजे यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते. त्यांनी आर्त हाक दिली आणि व्यथा मांडायला सुरुवात केली. होतं तेवढं सगळं शेत पाण्याबरोबर वाहून गेलं आहे. पिकाबरोबर मातीसुध्दा वाहून गेल्याने कसं जगावं प्रश्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले की, आत्महत्या करू नका. मुख्यमंत्री, देशाचे कृषीमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांना भेटून तुमची व्यथा सांगून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
 यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, माझी सरकार ला विनंती आहे की, नदीच्या काठावरच्या किंवा ओढ्याच्या काठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे लवकर करून घ्यावेत. माती वाहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशी मागणी करून ही नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारला भाग पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन 
यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिटवून मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावे, पिककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून घ्यावे, सन2020-21मधील लोकसभेतील शेतकरी विरोधी विधेयक रद्द करून स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, सन2020-21या वर्षीचा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पीकविमा मंजूर करण्यात यावा आदी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे.

शिवाय तालुक्यात अचानक आलेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पाणी व वादळाने बागायती आणि जिरायती दोन्ही शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्याचे आर्थिक अडचणीत वाढ होऊन कंबरडे मोडले आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगाला तर देश जगेल. आपण छत्रपती या नात्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची समन्वय साधून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. निवेदनावर प्रमोद कदम अध्यक्ष संभाजी ब्रिगेड निलंगा शाखा सोबत अमोल माने, इरशाद शेख ,नयन माने, प्रसाद झरकर,पेरमेश्वर बोधले ,बरमदे सर, सुबोध गाडीवान,अजित लाभे ,कृष्णा बिरादार, पवववनराजे बिरादार उपस्तीत होते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com