उस्मानाबादला पावसाने झोडपले, रस्ते झाले जलमय

सयाजी शेळके
Sunday, 11 October 2020

उस्मानाबाद शहराला रविवारी (ता.११) पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले.

उस्मानाबाद : शहराला रविवारी (ता.११) पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. याशिवाय जिल्ह्यातही परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून रविवारी पहाटे तसेच दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस होत असून सोयाबीन पिकाचे नुकसान होत असले तरी रब्बी पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू, पिकांचे नुकसान

रविवारी पहाटे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्याच्या अनेक भागातही चांगला पाऊस झाला. त्यानंतर रविवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. त्यामुळे सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविली जात होती. शहरात दुपारी एकच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरवातीला रिपरिप सुरू झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही सुमारे तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दरम्यान शहरात जनता संचारबंदी असल्याने रस्तेही सामसूम होते. मात्र वाहनांची तुरळक गर्दी रस्त्यावर पाहायला मिळत होती.

पाणी रस्त्यावर
पावसाचा तडाखा मोठा असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे पाऊस संपताच रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. शहर बसस्थानक, शिवाजी महाराज चौक, तुळजाभवानी क्रीडांगणच्या पवार व्यापारसंकुलनासमोरील रस्ता आदी भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर
जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील बेन्नतुरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. तुळजापूर, लोहारा तसेच उस्मानाबादच्या ग्रामीण तसेच शहरी भागात जोरदार पाऊस झाला आहे. भूम, कळंब, वाशी आणि परंडा तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून या पावसाने अनेकांच्या सोयाबीनच्या राशीचे नुकसान झाले आहे. असे असले तरी हा पाऊस येणाऱ्या रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Hit Osmanabad