esakal | उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू, पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damaged Sugarcane

उमरगा शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून दमदार पाऊस सुरू आहे. अगोदरच पाण्यात लटकलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असताना पुन्हा झालेल्या पावसाने आणखीन अडचणीत वाढ केली आहे.

उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू, पिकांचे नुकसान

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून दमदार पाऊस सुरू आहे. अगोदरच पाण्यात लटकलेल्या सोयाबीनच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असताना पुन्हा झालेल्या पावसाने आणखीन अडचणीत वाढ केली आहे. दरम्यान चोवीस तासांत पाच ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यु झाला आहे. बेन्नीतूरा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत असून अनेक तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


उमरगा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच सुरवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे ऐन काढणीच्या स्थितीत असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात पाणी साचले होते. मागच्या आठ-दहा दिवसांत पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीची जोडणी करुन ताडपत्रीच्या आच्छादनाने सोयाबीन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. काही जण राशीही सुरु केल्या होत्या. तसेच सोयाबीन काढणीसाठी शिवारात मजूरांची गर्दी दिसत होती.

मराठवाड्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, तीन महिला जखमी

मात्र दोन दिवसांत झालेल्या पावसाने सोयाबीनची काढणी आणि राशीच्या कामात विघ्न आणले आहे. ऐनवेळी सुरू होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कदेर येथील शेतकरी भगवान जेमला जाधव यांचा दोन एकर ऊस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संपूर्ण आडवा पडला आहे. तुर व सोयाबीनचे  मोठे नुकसान झाले आहे.

भगवान जेमला जाधव, दादाराव बाबू पवार, विजयकुमार बिराजदार यांच्या शेतातील ऊस भुईसपाट झाले आहेत, तर इतर काही शेतकऱ्यांची तुरीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दहा) रात्री बारानंतर काही भागात चांगला पाऊस झाला. मुळज महसूल मंडळात ४८, उमरगा २८, दाळींब ४३, मुरूम २० तर नारंगवाडी महसूल मंडळात चार मिलिमीटर पाऊस झाला आहे. रविवारी (ता.११) दिवसभर काही भागात पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या.

वीज पडून पाच जनावरे दगावली
गेल्या चोवीस तासांत विजेच्या कडकटासह झालेल्या पावसात दाळींब (ता.उमरगा) ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर तांडा येथे शनिवारी (ता.दहा) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. रामा खुबा राठोड हे शनिवारी म्हैस व गाय शेतातील बाभळीच्या झाडास बांधुन सोयाबीन काढणीस गेले होते.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे श्री.राठोड हे बाभळीच्या झाडाखाली म्हैस व वासराला सोडण्यासाठी जात असताना अचानक वीज झाडावर पडून गाभण म्हैस व गायीचा मृत्यु झाला. दाळींब शिवारात ओमकार तानाजी जाधव यांची जर्सी गायीचा वीज पडून मृत्यू झाला. गुगळगाव येथील सुधाकर माधव बिराजदार यांच्या मालकीची गाय वीज पडून दगावली. काळलिंबाळा येथे  मारुती पांडुरंग बिराजदार यांची  म्हैस विज पडुन दगावली. दरम्यान उमरगा शहरात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मुन्शी प्लॉट येथील शिवाजी चव्हाण यांच्या घरावर वीज पडली, त्यात सौरउर्जा पॅनल जळून नुकसान झाले.

संपादन - गणेश पिटेकर