बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथे मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारे व पावसाने घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच एक भिंत कोसळली तर विजेचे खांबही वाकले व झाडेही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला

बीड - जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) सायंकाळच्या दरम्यान जोराचे वारे सुटले. त्यानंतर काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे आष्टी तालुक्यात मोठे नुकसान झाले. बीड शहरात रात्री आठ वाजेच्या दरम्यान विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाला सुरवात झाली. परिसरासह इतर भागांतही पावसाने हजेरी लावली. 

आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथे मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारे व पावसाने घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच एक भिंत कोसळली तर विजेचे खांबही वाकले व झाडेही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आष्टी शहरात व परिसरातील गावांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. नगर जिल्हा सरहद्दीवरील पिंपळा, कोयाळ, निमगाव, बोडखा, नांदूर आदी भागातदेखील पावसाने तडाखा दिला. रात्री उशिरापर्यंत अवकाळी पाऊस सुरूच होता. इतरही अनेक गावांत नुकसान होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ भागात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामध्ये राजू शेख यांच्या घरावरील संपूर्ण छत उडून पडले. प्रकाश निलाखे यांच्या घरावर बाभळीचे झाड पडून नुकसान झाले. भाऊसाहेब जगधने, बापू आगाशे, आसाराम आगाशे, हनुमंत काकडे यांच्या घराचे नुकसान झाले, तर सुनील थोरवे यांची आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा काढून ठेवला होता तो संपूर्ण पाण्यात सापडल्याने नुकसान झाले आहे. विजेची तार तुटून पडल्याने या परिसरात अंधार पसरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains with thunderstorms in Beed district