जड वाहनांना शहरात एंट्री तात्पुरतीच !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

चारही प्रकारच्या वाहनांवर पुन्हा बंदीची शक्‍यता

चारही प्रकारच्या वाहनांवर पुन्हा बंदीची शक्‍यता
औरंगाबाद - दोन वर्षांपासून ट्रॅव्हल्सची वाहने, जड वाहने तसेच मध्यम वाहने व डिझेल रिक्षांना शहरात "नो एंट्री' होती; परंतु या अधिसूचनेत कायदेशीर अडचणी उद्‌भवल्याने तूर्तास हे आदेश पोलिस विभागाने मागे घेतले आहेत. अडचणी दूर झाल्यानंतर पुन्हा शहरात दिवसा चारही प्रकारच्या वाहनांना बंदी येण्याची शक्‍यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने पोलिस विभागाने जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स व डिझेल रिक्षांना बंदी घातली होती. यासंबंधी अधिसूचना काढल्यानंतर अंमलबजावणी सुरू झाली; परंतु याविरोधात तसेच काळी-पिवळीला शहरात नो एंट्री केल्याच्या विरोधात काही वाहनचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. यात कायदेशीर अडचणी दिसून आल्यानंतर पोलिस विभागाने काळी-पिवळीसंबंधित पूर्वीची अधिसूचना रद्दबातल केली. त्यामुळे काळी-पिवळीचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. परंतु, काही दिवसांतच नवीन अधिसूचना पोलिसांनी काढून काळी-पिवळीला शहरात दिवसा "नो एंट्री' केली. अशाच पद्धतीने जड, मध्यम वाहने, डिझेल रिक्षा व ट्रॅव्हल्ससबंधी पूर्वीच्या अधिसूचनेत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशी बाब पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितली. त्यामुळे पूर्वीची अधिसूचना रद्द करण्यात आली. काही दिवसांत नवीन अधिसूचना काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बंदी घातलेल्या वाहनांना काही दिवस शिथिलता मिळणार असून पुन्हा बंदीची टांगती तलवार कायम राहणार आहे.

कायदेशीर प्रकियेत अडचणी आल्यामुळे आम्ही अधिसूचना मागे घेतली आहे; परंतु कायदेशीर प्रक्रियेतील अडचणी दूर झाल्यानंतर सर्व बाबींची पूर्तता करून दोन दिवसांत लगेचच नवीन अधिसूचना काढली जाणार आहे.
-- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त.

Web Title: heavy vehicle temperory entry in city