हेल्मेट सक्तीस महिनाभराची मुदतवाढ द्या

Helmet
Helmet

लातूर - नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळ, मंदी, पेट्रोल- डिजेलसह गॅसचे वाढणारे भाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आणि तेही सणासुदीच्या तोंडावर हेल्मेट सक्तीने नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडणार आहे. याचा विचार करून हेल्मेट सक्तीला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आम्ही लातूरकर युवक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तीन दिवसांत शहरातील सर्व दुचाकीचालकांना हेल्मेट कसे उपलब्ध होणार, असा सवालही समितीने उपस्थित केला आहे. 

लातूर पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून (ता. १६) शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्र होणार आहे. ज्या दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नाही, त्यांना ५०० रुपयांचा दंडही केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांची भेट घेऊन त्यांना मुदतवाढीसंदर्भात निवेदन दिले. पथदिव्यांचा अभाव, रस्त्यावरील खड्डे, सिग्नल बंद असणे, गतिरोधक नसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात होतात. याकडे अधिक लक्ष दिले जावे, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली. या वेळी प्रदीपसिंह गंगणे, रणधीर सुरवसे, अविराजे निंबाळकर, ताहेरभाई सौदागर, दिनेश रायकोडे, बालाजी पिंपळे, विष्णू जाधव, सुशीलकुमार, अनिल जाधव, बबन मदाड, साईनाथ घोणे, जावेद मणियार, अशोक कांबळे उपस्थित होते.

समितीच्या मागण्या
- शहरातील सर्व रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा 
- शहर आणि जिल्ह्यातील रहदारीच्या सर्व चौकांत सिग्नल बसवा
- शहरात सुरक्षित पार्किंग व्यवस्था सुरू करा
- रस्त्यांना दुभाजक बसवा. सुरक्षित वाहतुकीबाबतचे फलक लावा
- रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलिस चौकात उभे असावेत

अधिकाऱ्यांना दंड करणार का?
जनतेच्या हितासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला, तो योग्यच आहे; पण शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, पथदिवे नसल्याने शहराचा निम्मा भाग अंधारात आहे, भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त लावला जात नाही, सिग्नल बंद असतात... याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज एक हजार रुपयांचा दंड करावा. त्यामुळेही जनतेच्या बऱ्याच अडचणी दूर होतील, असे कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com