ईद-ऊल-अजहाच्या नमाजवेळी मदतीचे हात आले पुढे -

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ऊल-अजहा सण जिल्हाभरात उत्साहात साजरा झाला. मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा करून पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे अशी मागणी अल्लाहकडे केली. पूरग्रस्तांसाठी अल्लाहकडे दुवाही मागण्यात आली. अनेक ठिकाणी पूरग्रस्तांसाठी मदतफेरी काढण्यात आली.

लातूरः एकीकडे पाऊस नसल्याने दुष्काळ आहे, तर दुसरीकडे पुरामुळे सांगली, कोल्हापूरसारख्या शहरासोबत शेकडो गावे पाण्याखाली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येऊ लागले आहेत. यात मुस्लिम बांधवही मागे राहिले नाहीत. येथे बकरी ईदनिमित्त झालेल्या नमाजाच्या वेळी मदत करण्यासाठी बांधव सरसावले होते. तर, अनेकांनी ही मदत मिळावी याकरिता पुढाकार घेतला होता. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वच जण एकत्र येतात हेच या निमित्ताने दिसून आले. या निमित्ताने लातूर आणि परिसरात पाऊस पडावा याकरिता अल्लाहकडे दुआ मागण्यात आली. 

जिल्ह्यात सोमवारी (ता. 12) ईद-ऊल-अजहा उत्साहात साजरी झाली. या निमित्त येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आला. यावेळी मुफ्ती साबेर यांनी नमाज अदा केल्यानंतर हजारो मुस्लिम बांधवांनी त्यांच्या पाठीमागे नमाज अदा केली. तर, मुफ्ती ओवेज यांनी विश्वशांतीसाठी, पाऊस पडावा, पूरग्रस्तांसाठी अल्लाहकडे दुआ मागितली. आपल्यावर नैसर्गिक संकट आले आहे. काही ठिकाणी दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. अशा वेळी सर्वांनी मदत करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले. यावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर, महापौर सुरेश पवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे, ऍड. प्रदीप गंगणे आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. 
आजच्या ईदचे वेगळेपणही दिसून आले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे

. या दोन्ही शहरांसोबत शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. तेथील लाखो लोकांना आज मदतीची गरज आहे. शासन प्रयत्न करीत असले तरी आपणही मदतीचा हात पुढे केला पाहिजे. हे लक्षात घेऊन नमाजच्या वेळी मुस्लिम बांधव देखील मदतीसाठी सरसावले होते. अनेक बांधवांनी मदत करावी, असे आवाहन करीत हातात पेटी घेऊन मदत गोळा केली. यात चिमुकलेही मागे नव्हते. शेकडो मुस्लिम बांधवांनी या मदतीसाठी हातभार लावत नैसर्गिक संकटात धर्म, जात आडवे येत नाही हेच दाखवून दिले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help came forward during the prayer of Eid-ul-Azha