शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘एनएसएस’ची मदत

सुषेन जाधव
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

राज्यात शेतकरी आत्महत्या होऊ नयेत या उद्देशाने कार्याला सुरवात केली आहे. शासनानेही कार्याची दखल घेतली याचा आनंद आहेच. सेवायोजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने या कार्याला गती मिळेल. ‘तुम्हीच आमचे मायबाप, आम्ही तुमची लेकरं आहोत त्यामुळे आत्महत्येचा विचारही करू नका’ अशी साद घातल्याने आतापर्यंत बऱ्याच आत्महत्या टळल्याचा अनुभव आहे. 
- विनायक हेगाणा, संस्थापक, शिवार सांसद चळवळ

शासनाची मोहीम - प्रबोधनासह विविध उपक्रमांवर भर, कोल्हापूरचा तरुण देणार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
औरंगाबाद - राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने आता महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवायोजनेची (एनएसएस) मदत घेण्याचे ठरविले आहे. राज्य शासनाने तसे आदेश संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षांपासून काम करणारा कोल्हापूर येथील विनायक हेगाणा हा तरुण सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

‘दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर विनायक गेल्या दोन वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात काम करीत आहे. त्याने लिहिलेल्या ‘शेतकरी आत्महत्या - कारणे व शाश्‍वत उपाय’ या पुस्तिकेची, कार्याची शासनाने दखल घेतली आहे. त्यातून ही मोहीम पुढे येत आहे. ‘बीएस्सी’ झाल्यानंतर विनायकने मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्याचे ठरविले. त्यात शेतकरी आत्महत्या हा मुख्य मुद्द होता. त्याने दौरे करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यातून त्याला आत्महत्येमागची काही कारणे समजली. अनुभव, चर्चेतून आलेल्या बाबींवर त्याने ‘शेतकरी आत्महत्या ः कारणे व शाश्‍वत उपाय’ ही पुस्तिका लिहिली. तीत मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मूळ कारणे, उपाय आदी सर्वेक्षणाअंती तपशीलवार माहिती दिली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्यक्ष कार्याचा ॲक्‍शन प्लॅनही त्याने दिला आहे. केवळ प्रश्‍नोत्तरे, चर्चाच नाही, तर विद्यार्थ्यांना समजतील असे शाश्‍वत उपाय, कृती आराखडा दिला आहे. त्याची शासनाने दखल घेतली आहे. त्यातूनच या कामी सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे शासनाने ठरविले. राज्यातील विद्यार्थ्यांचे संख्याबळ पाहता सेवायोजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे शासनाने ही भूमिका घेतल्याचे विनायकने सांगितले. यासाठी www.shivarsansad.com हे संकेतस्थळही सुरू केल्याचे तो म्हणाला.

कसे असेल प्रत्यक्ष काम 
लवकरच विनायक आणि राज्यातील सर्व विद्यापीठांतील सेवायोजनेचे कार्यक्रम समन्वयक, राज्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह कार्याची दिशा ठरेल. विद्यापीठे, महाविद्यालये, जिल्हा, तालुका या टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गावांत जाऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, या संदर्भात जागृतीवर भर राहील. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शाश्‍वत मदत, राज्यातील पाच लाख सेवा संस्थांशी शेतकऱ्यांना जोडणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, प्रचार-प्रसार, गटशेतीचे फायदे पटवून देणे आदींवर भर दिला जाईल.

शेतकरी घेतील प्रतिज्ञा 
सेवायोजनेचे विद्यार्थी गावागावांत जातील. ‘मी आत्महत्या करणार नाही, कुणाला करू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा साऱ्या गावाकडून करून घेतील. त्याशिवाय सेवायोजनेतील विद्यार्थी प्रत्येक शेतकऱ्याला ‘हताश होऊ नका’ या आशयाखाली पत्र लिहितील. नैराश्‍य आल्यास विद्यार्थ्यांशी संपर्काचे आवाहन करतील.

Web Title: Help farmers nss to prevent suicide