दंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

औरंगाबाद - शहरात घडलेल्या दंगलीला बेकायदा नळ तोडणे, शहागंज भागात झालेल्या वादाची पार्श्‍वभूमी असून, याप्रकरणी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी शनिवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केली. 

औरंगाबाद - शहरात घडलेल्या दंगलीला बेकायदा नळ तोडणे, शहागंज भागात झालेल्या वादाची पार्श्‍वभूमी असून, याप्रकरणी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी शनिवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केली. 

दंगलग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्री. पाटील म्हणाले, की एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली. एक पथक जाळपोळीच्या घटनांचे पंचनामे तर दुसरे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. दंगलीला गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांची पार्श्‍वभूमी असल्याचे नागरिकांसोबत केलेल्या चर्चेनंतर समोर आले. त्याअनुषंगाने उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर समितीतील अधिकाऱ्यांची नावे व चौकशीचा वेळ निश्‍चित केला जाईल. शिवसेना व एमआयएममधील वादामुळे दंगल घडली का, अशी विचारणा केली असता, तसे म्हणता येणार नाही, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

या मुद्यांवर होणार चौकशी 
जुन्या घटनांची पार्श्‍वभूमी, पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्यास कमी पडले का? उशिरा पोचले का? सोशल मीडियावरून वातावरण बिघडवणारे मेसेज टाकले का? फायरिंग चुकीच्या पद्धतीने झाली का? पेट्रोल, रॉकेलच्या बाटल्या टाकून जाळपोळ करण्यात आल्याने दंगल पूर्वनियोजित होती का? अनेक पोलिस अधिकारी एकाच वेळी सुटीवर गेले, यासह इतर मुद्यांवर चौकशी केली जाणार आहे. 

नियमित पोलिस आयुक्त देणार 
नियमित पोलिस आयुक्त नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर नियमित पोलिस आयुक्त लवकरच देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

Web Title: high-level inquiry into the riots that took place in Aurangabad city