औसा, चाकूर, जळकोटमध्ये तापमानात वाढ, नागरिक उष्णतेने हैराण

Temperature News, Ausa, Chakur, Jolkot
Temperature News, Ausa, Chakur, Jolkot

औसा/चाकूर/जळकोट (जि.लातूर) : औसा, चाकूर आणि जळकोटसह तालुक्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून औसा परिसरातील तापमानात वाढ झाली असून, कमाल तापमान त्रेचाळीसच्यावर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांनी या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कूलरचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. अचानक तापमानात वाढ झाल्याने शेवटचे रोजेही अनेकांना लागत आहेत. रात्रीही हा उकाडा लोकांची पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या परिसरात दिसत आहे.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून औसा तालुक्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून, या वाढत्या तापमानाचा सर्वांत जास्त त्रास रमजानच्या रोजेदारावर होत आहे. वाढलेल्या या तापमानामुळे शेवटचे तीन रोजे खूप जड गेल्याचे अनेकजण सांगताना दिसत आहेत. तर सर्वसामान्य माणसांचेही या वाढलेल्या तापमानाने कंबरडे मोडले आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेवटच्या मशागती शेतकऱ्यांकडून सुरू आहेत. मात्र सकाळी आठ वाजल्यापासून ऊन लागत असल्याने पहाटे लवकरच या मशागती शेतकरी करताना दिसत आहेत. घरात कूलर किंवा एसी लावल्याशिवाय बसवत नसल्याने अनेक घरात आता कूलरचा आवाज घुमत आहे. ही उष्णता आणखी काही दिवस राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बाहेर कोरोना आणि घरात उकाडा आशा दुहेरी अडचणीत नागरिक सापडले आहेत.


उष्णतेचा परिणाम लहान मुलांवर आणि वृद्ध लोकांवर लवकर होतो. त्यामुळे अशा तापमानात लहान मुलांना बाहेर घेऊन जाऊ नये. त्यांना भरपूर पाणी पाजावे, आहारात तरल पदार्थ खाऊ घालावे, थंड ठिकाणी मुलांना ठेवण्याचा प्रयत्न करावा. वृद्ध व्यक्तींनी उन्हात जाणे टाळावे, अनेकांची घरे पत्र्याची असल्याने दुपारी अशा घरात खूप गरमी वाढते. त्यामुळे पत्र्यावर आच्छादन करावे जेणेकरून घरातील तापमान कमी होणासाठी मदत होईल. इतर लोकांनीही दुपारच्या वेळी बाहेर पडू नये, छत्री किंवा डोक्याला, कानाला पांढरे फडके गुंडाळून बाहेर पडावे.
- अंगद जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, औसा

चाकूर तालुक्यात तापमानात वाढ
चाकूर तालुक्यात दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून रविवारी (ता.२४) आतापर्यंतच्या सर्वांत जास्त ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून दुपारनंतर वाढलेल्या उन्हामुळे घराबाहेर निघणेही अवघड झाले आहे. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होते. तालुक्यात मागील दोन दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आजपर्यंत कधीही वाढलेले नव्हते. यामुळे रस्त्यावर माणसांचा शुकशुकाट दिसत आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तापमानात वाढ झाल्यामुळे कडक उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. यामुळे पंखे, कूलरसोबतच फळाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.


जळकोटसह तालुक्यात उष्णतेत वाढ
जळकोट शहरासह तालुक्यात उष्णता वाढली असून, रविवारी (ता.२४) दुपारी ४२ अंश सेल्सिअस तापमान होते. यामुळे डोंगरी तालुक्यातील रहिवासी उष्णतेने हैराण झाल्याचे दिसले. तालुक्यात शेतातील झाडाखाली सावलीचा आधार अनेकजण घेत आहेत. कोरोनामुळे थंड पाणी पिण्याचे ती टाळत आहेत. शेतीकामे करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. काही भागात ४३ अंश सेल्सिअस तापमान दाखवत असल्याचे सांगितले. टाळेबंदीमुळे रस्ते निर्मुनष्य झाले आहेत. उन्हामुळे वातावरणात कमालीचा उष्मा वाढला आहे. तालुक्यात सकाळी दहापासून ते सायंकाळी साडेसहापर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com