भाईचारा! हनुमान जन्मोत्सव...महापंगतीसाठी मुस्लिम बांधवांनी घेतला पुढाकार

मुस्लिम बांधवांनी हनुमान जयंतीच्या महापंगतीचे यजमानपद घेत नवा आदर्श घालून दिला आहे.
Hindu Muslim Unity News
Hindu Muslim Unity Newsesakal

बीड : आठ दिवसांचा हरिनाम सप्ताह संपून हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्त पालखी मिरवणूक व लळीत नाट्यही झाले. देणगी आणि खर्चाचा हिशोब करत अख्खं गाव हनुमान मंदिरात जमलंय, मागे कसे झाले पुढे काय करायचे, मंदिराच्या विकासाची चर्चा सुरुय. त्यात महापंगतीचे यजमानपद घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच मुस्लिम तरुणांचा एक जत्था थेट हनुमान मंदिरात येतो. हनुमान जन्मोत्सवाची महापंगतीचे यजमानपद आम्हाला द्या, असा आग्रह करतो. ग्रामस्थांसह महापंगतीसाठी अगदी टोकाचा आग्रह करणारेही चार पावले मागे म्हणजेच सामाजिक एकोपा आणि सलोख्यासाठी दोन पावले पुढे येऊन महापंगतीचे यजमानपद सहशिक्षक सादेक कुरेशी व खदीर शेख यांना देण्यात आले. (Hindu Muslim Unity Muslims Come Forward For Food Distribution On Occasion Of Hanuman Janmostav In Beed)

Hindu Muslim Unity News
महाराष्ट्रात २१ व २२ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

ग्रामस्थांनी महापंगतीच्या यजमानपदाचा नारळ देऊन दोघांचा सत्कारही केला. सध्या अजान, भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवर सर्वत्र घामासान सुरु असून यामुळे सामान्य समाजमन देखील ढवळून निघाले आहे. पण, यातच मुस्लिम बांधवांनी हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) महापंगतीचे यजमानपद घेत नवा आदर्श घालून दिला आहे. तसा हा प्रकार ज्या गावात घडला त्या विडा (ता.केज) येथे सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या अनेक परंपरा शंभराहून अधिक वर्षांपासून आहेत. विडा येथे राजा हनुमान हे ग्रामदैवत असून तेलाचा आणि दक्षिणमुखी मारुतीचे हे मंदिर भव्य आहे. परिसरात नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती आहे. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह होतो. नंतर हनुमान जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी महापंगत दिली जाते. याच दिवशी गावातून पाखलीची भव्य मिरवणूक निघते. (Hindu Muslim Unity)

Hindu Muslim Unity News
थोडे मनोरंजन व्हायला नको का ? सुप्रिया सुळे यांची राज यांच्या सभेवर टीका

विशेष म्हणजे काम, नोकरी, रोजगारासाठी बाहेरगावी असलेले कुठल्या सणाला येवो न येवो व या जन्मोत्सव व पालखी सोहळ्यासाठी हमखास गावी असतात. दरम्यान, शुक्रवारी (ता. १५) यंदाचा हरिनाम सप्ताहाची सांगता श्रीराम महाराज विडेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. शनिवारी (ता.१६) भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळा हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. रविवारी (ता.१७) रात्री गावातून हनुमान महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघाली. टिपरे, लेझिम, ढोल पथक, टाळ - मृदंग, पारंपारिक, धार्मिक आणि इतर देखाव्यांचा ही यात समावेश होता. या उत्सवासाठी ग्रामस्थांनी जमा केलेली देणगी, झालेला खर्च, भविष्यात करावयाचे उपक्रम, बांधकाम आदींबाबत सोमवारी (ता.१७) ग्रामस्थांची मंदिराच्या सभागृहात बैठक सुरु होती. मागचे दोन वर्षे कोरोनामुळे सप्ताह, पालखी मिरवणूक आणि महापंगत झालेली नव्हती. त्यामुळे त्या दोन वर्षे महापंगतीचे यजमानपद घेतलेले आणि आणखी पुढच्या वर्षीचे यजमानपद देण्याबाबत खल सुरु होता.

Hindu Muslim Unity News
UPSC च्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...

महापंगतीचे यजमानपद मागणाऱ्यांची संख्या अधिक झाल्याने चिठ्ठ्या टाकून लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून नाव निश्चित करण्याचे ठरलेले असतानाच सहशिक्षक सादेक कुरेशी आणि खदीर शेख मुस्लिम समाजबांधवांसह मंदिरात आले. आम्हीही तुमचे भाऊच आहोत. अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रमांत तुमच्या सोबत असतो. त्यामुळे महापंगतीचे यजमानपद आम्हाला द्या, अशी विनंती या दोघांनी केली. इतर मागणाऱ्यांची स्पर्धा असतानाच आता नवे स्पर्धक आल्याने राजा हनुमान प्रतिष्ठानची कर्तीधर्ती मंडळी निरुत्तर झाली. नेमका तोडगा काय काढायचा असा पेच निर्माण झाला. पण, सर्वांनी एकमुखी सादेक कुरेशी व शेख खदीर यांना पुढच्या महापंगतीचे यजमानपद द्यावे, आम्ही नंतर करु, असे चार पावले मागे घेत सामाजिक एकोप्यासाठी हात पुढे केले. तसे, विडा गावाला विविध परंपरा तर आहेतच शिवाय अनेक अधिष्ठानेही आहेत. निझाम राजवटीत याच गावातील ठाकूर आनंदराव देशमुख यांना ५४ गावची जहागीरदारी असलेल्या विडा येथे साधू शिवरामपुरी यांची संजीवन (जिवंत) समाधी देखील आहे. तर, तेलाचा हनुमान असलेले भव्य दक्षिणमुखी हनुमान मंदिरही गावाला आहे. मराठवाडा (Marathwada) मुक्तीसंग्रामात गावातील अनेकांचा आग्रभागी सहभाग होता.

Hindu Muslim Unity News
भाईचाऱ्याचे दर्शन! आधी कुराण, नंतर रथोत्सव; चेन्नाकेशव मंदिरातील परंपरा

याच हनुमान जन्मोत्सवात लळित नाट्याचीही शंभर वर्षांची परंपरा आहे. नाट्याच्या माध्यमातून मध्ययुगीन कालखंडातील जातीय व्यवस्था, समाजरचना, समाजांची श्रमविभागणी आणि त्या काळातील सामाजिक रचना सोंगाच्या माध्यमातून हुबेहुब सादर केली जाते. यात ब्राह्मण व फकीर हे सोंग देखील पूर्वापारपणे आणले जाते. विशेष म्हणजे त्यात धार्मिक बाबींचा ऊहापोह आपापल्या धर्माविषयी वादविवादाच्या रुपाने महत्त्व पटवून दिले जाते. नाट्यातून ‘तुम्ही आम्ही मुळी एक आहो’ असा धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला जातो. विशेष म्हणजे मरेपर्यंत हे सोंगाचे पात्र ख्वाजामियाँ शेख व अनंतराव पटाईत हे वटवत. पुढे राजकारणात देखील गावाचे नाव ज्ञानोबराव विडेकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पोचले. श्री. विडेकर तीन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. तर, कावेराबाई व बाबासाहेब पटाईत या गावातील दाम्पत्याने जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलेले आहे. या गावात धुलीवंदनाला एका जावयाची गाढवावरुन मिरवणूक तर निघतेच. पण, यातून देखील सामाजिक एकोपा आणि सलोखा जपलेला आहे. यात आतापर्यंत सर्वधर्मीय व सर्वजातीय जावयांची मिरवणूक निघालेली आहे. विशेष म्हणजे सादेक कुरेशी हे गावातच सहशिक्षक असून त्यांची सासुरवाडी देखील गावातीलच आहे. त्यामुळे त्यांनाही ग्रामस्थांनी हा मान दिलेला आहे. त्यांना यापूर्वी गावच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद देखील ग्रामस्थांनी दिलेले आहे. अनेक मिरवणुका, सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रामांत गावकरी एकमेकांच्या हातात हात आणि गळेभेट घेऊन कायम भाईचारा जपतात. आता भोंगे, हनुमान चालिसा आणि अजानवरुन सर्वत्र वातावरण गढूळ होत असतानाच मुस्लिम बांधवांनी हनुमान जन्मोत्सवाच्या पंगतीचे यजमानपद घेऊन विडेकरांच्या भाईचाऱ्याच्या पुस्तकात नवा अध्याय लिहिला आहे. दरम्यान, राजा हनुमान प्रतिष्ठानचे एकनाथ पटाईत, रंगनाथ पटाईत, राजेंद्र देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य विजयकुमार पटाईत, चंद्रकांत कुलकर्णी, सुरेंद्र पवार, शाम गायकवाड आदींनी सादेक कुरेशी व खदीर शेख यांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com