हिंगोली : ऑपरेशन मुस्कानअंतर्गत १५ बाल कामगारांची सुटका

राजेश दारव्हेकर
Friday, 25 December 2020

शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. तसेच त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत १८ वर्षाखालील बालकांना शासनाच्या वतीने मासिक ४२५ रुपये लाभ दिला जातो

हिंगोली : शहरातील नांदेड नाका परिसर, बस स्थानक, मच्छी मार्केट, इंदिरा चौक, हॉटेल व गॅरेज आदी ठिकाणी पथकांकडून बालकामगार शोध मोहिम राबविण्यात आली. ज्या मध्ये बालकामगार, अनाथ, निराधार, निराश्रीत व एक पालकत्व असलेल्या बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करुन त्यांना बालगृहात प्रवेश दिला जातो.

शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. तसेच त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत १८ वर्षाखालील बालकांना शासनाच्या वतीने मासिक ४२५ रुपये लाभ दिला जातो. यामुळे साहजिकच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुखकर होण्यास मदत होते. शहरात मोहिम राबवित असतांना सापडलेल्या १५ बालकामगारांचे व त्यांच्या पालकांचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने समुपदेशन करुन त्यांची सुटका केली व पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा हिंगोली : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, जिल्ह्यासह परजिल्ह्यातील २३ दुचाकी जप्त

येथील पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ता. २३ डिसेंबर,रोजी ऑपरेशन मुस्कान मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे आयोजन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, पोलिस उपाधीक्षक आश्विनी जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले होते.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस हवालदार शेख इस्माईल, महिला पोलिस अधिकारी स्वाती डोल्हारे, संरक्षण अधिकारी  गणेश मोरे, जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी मोहिम राबविण्यासाठी सहकार्य केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: 15 child laborers released under Operation Muskan hingoli news