हिंगोली: 74 हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

मंगेश शेवाळकर
रविवार, 21 मे 2017

सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसुचीत जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मुलांना तसेच मुलींना मोफत गणवेश दिला जातो. यासाठी पुर्वी तालुकास्तरावर प्राप्त झालेला निधी केंद्रस्तरावर देऊन त्यानंतर कपडे खरेदी करून दिले जात होते.

हिंगोली - जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानातंर्गत 74 हजार 794 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार असून, यावर्षी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे तीस कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे.

जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसुचीत जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मुलांना तसेच मुलींना मोफत गणवेश दिला जातो. यासाठी पुर्वी तालुकास्तरावर प्राप्त झालेला निधी केंद्रस्तरावर देऊन त्यानंतर कपडे खरेदी करून दिले जात होते. मात्र यावर्षी पासून विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त बॅंक खात्यामधे दोनशे रुपये या प्रमाणे दोन गणवेशाचे चारशे रुपये जमा केले जाणार आहेत.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 74 हजार 794 विद्यार्थ्यांना या गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये हिंगोली तालुक्‍यात अनुसूचित जाती संवर्गातील दोन हजार 698, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 795, दारिद्रय रेषेखालील एक हजार 698 विद्यार्थी तर दहा हजार 566 विद्यार्थीनी अशा एकूण पंधरा हजार 757 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

सेनगाव तालुक्‍यात अनुसूचित जाती संवर्गातील दोन हजार 349, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 909, दारिद्रय रेषेखालील एक हजार 688 विद्यार्थी तर दहा हजार 252 विद्यार्थीनी अशा एकूण पंधरा हजार 471 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

वसमत तालुक्‍यात अनुसूचित जाती संवर्गातील दोन हजार 526, अनुसूचित जमाती संवर्गासाठी 552, दारिद्रय रेषेखालील एक हजार 830 विद्यार्थी तर अकरा हजार 292 विद्यार्थीनी अशा एकूण पंधरा हजार 198 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

कळमनुरी तालुक्‍यात अनुसूचित जाती संवर्गातील दोन हजार 22, अनुसूचित जमाती संवर्गासाठी दोन हजार 297, दारिद्रय रेषेखालील 720 विद्यार्थी तर दहा हजार 668 विद्यार्थीनी अशा एकूण पंधरा हजार 707 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

औंढा नागनाथ तालुक्‍यात अनुसूचित जाती संवर्गातील एक हजार 412, अनुसूचित जमाती संवर्गासाठी एक हजार 360, दारिद्रय रेषेखालील एक हजार 267 विद्यार्थी तर आठ हजार 622 विद्यार्थीनी अशा एकूण बारा हजार 661 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात अनुसूचित संवर्गातील अकरा हजार पाच, अनुसूचित जमाती संवर्गातील पाच हाजर 913, दारिद्रय रेषेखालील सहा हजार 203 तर 51 हजार 673 विद्यार्थीनी अशा एकूण 74 हजार 794 विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे.

यासाठी सुमारे तीस कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केल्यानंतर त्याच्या पावत्या मुख्याध्यापकांकडे सादर करणे आवश्‍यक असल्याचे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Web Title: Hingoli: 74 thousand students get free uniforms