esakal | हिंगोली : मुलगा मरण पावल्याने पित्याकडुन डॉ. दांपत्यावर कारवाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेनगाव शहरातील चहाची हॉटेल चालवत असलेल्या पांडुरंग धोत्रे यांचा मुलगा महादेव धोत्रे हा आँक्टोंबर ता.१९ रोजी आजारी पडला होता. ताप आणि हातपाय दुखत असल्याचे त्याने आपल्या पित्याला सांगितले.

हिंगोली : मुलगा मरण पावल्याने पित्याकडुन डॉ. दांपत्यावर कारवाईची मागणी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : येथील महादेव पांडुरंग धोत्रे या तरुण युवकावर चुकीचा उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यु झाला असुन संबंधित डॉ. दांपत्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सेनगाव पोलीस प्रशासनाला मंगळवारी (ता. २७) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सेनगाव शहरातील चहाची हॉटेल चालवत असलेल्या पांडुरंग धोत्रे यांचा मुलगा महादेव धोत्रे हा ता. १९ आँक्टोंबर रोजी आजारी पडला होता. ताप आणि हातपाय दुखत असल्याचे त्याने आपल्या पित्याला सांगितले. पांडुरंग धोत्रे यांनी आपल्या मुलाला दवाखान्यात उपचारासाठी जायला सांगितले. त्यानंतर महादेव आपल्या आई बरोबर आठवडी बाजारातील डॉ. गोटे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला असता. त्याच्यावर डॉ. गोटे यांनी उपचार करून त्याला गोळ्या औषधे देऊन घरी पाठवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ता.२० रोजी महादेवची तब्यत आणखी खालावत गेली. त्याचे हातपाय अधिकच दुखत होते. हे पाहुन नातेवाईकांसह मित्र परिवाराने त्याला सकाळी सहा वाजता तात्काळ डॉ. गोटे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यासाठी आले असता त्यांचा दवाखाना बंद असल्याने त्यांच्या राहत्या घरी नेऊन दाखल करण्यात आले.

हेही वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणुक हालचालींना वेग; भाजपा मतदार नोंदणी अभियान -

महादेवची काळजी करू नका तो लवकरच बरा होईल- डाॅ. योगिता

यावेळी डॉ. गोटे यांनी महादेवला एक सलाईन चढवून त्यामध्ये एक इंजेक्शन देण्यात आले. दीड तासानंतर सलाईन संपले परंतु महादेवच्या प्रकृतीवर कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे डॉ. गोटे यांनी आपल्या दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले. व इथे देखील डॉ. गोटे त्यांच्या पत्नीकडुन महादेवला पुन्हा एक सलाईन लावण्यात आले. वेळोवेळी उपचार घेऊन सुध्दा महादेवच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याचा मित्र अमोल तिडके व गंगाराम फटांगळे यांनी डॉ. गोटे दांपत्याची भेट घेऊन महादेवच्या प्रकृतीत सुधारणा का होत नाही. त्याला पुढे हलवू का असे विचारले. तर डॉ.योगिता गोटे यांनी सांगितले की आमचे उपचार सुरु आहेत. महादेवची काळजी करू नका तो लवकरच बरा होईल. आम्ही डॉक्टर आहोत. असे उत्तर आले.

हिंगोलीला आणत असतानाच मृत्यू 

त्यानंतर १२ वाजताच्या दरम्यान महादेवची प्रकृती अधिक खालावत जात असल्याचे डॉ. गोटे यांच्या लक्षात आले. त्यांनी महादेवच्या नातेवाईकांना हिंगोलीला घेऊन जाण्यास सांगितले. आणि ॲम्बुलन्स मध्ये घेऊन जात असताना डॉ.गोटे यांना रुग्णासोबत येण्याचा आग्रह नातेवाईकांनी केला परंतु डॉ. गोटे महादेवची प्रकृती पाहता सोबत जाणे टाळले आणि या ॲम्बुलन्समध्ये जात असतानाच त्याचा मृत्यु झाला. यामुळे डॉ.गोटे यांनी चुकीचा उपचार करून जाणीवपूर्वक वेळ वाया घालवून महादेवच्या मृत्युला कारणीभूत डॉ.गोटे दांपत्य असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महादेवच्या पित्यासह गांवकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली सेनगाव पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

येथे क्लिक करा -  ओल्या दुष्काळात आगीची भर, ऊस, सोयाबीन खाक

डॉ. गोटे या दांपत्यावर कार्यवाही करून न्याय द्यावा

डॉ.गोटे यांच्या चुकीच्या उपचारामुळे व व्यर्थ वेळ वाया घालवल्यामुळे माझा मुलगा महादेव धोत्रे (वय २४)  हा ता. २० रोजी मरण पावला आहे. मी या प्रकरणी ता.२३ रोजी पोलीस ठाणे सेनगाव येथे जाऊन सर्व हकीकत सांगितली परंतु मला संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांकडुन उडवा- उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस प्रशासनाने डॉ. गोटे या दांपत्यावर कार्यवाही करून न्याय द्यावा.

- पांडुरंग धोत्रे, मयताचे वडील

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image