esakal | हिंगोली : भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे; कवडीमोल भावाने विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाला कवडीमोल भावाने

हिंगोली : भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे; कवडीमोल भावाने विक्री

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : कोरोना संसर्गामुळे मागील काही दिवसापासून सुरु असलेली संचारबंदी बंद, पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम आणि हॉटेल व्यवसाय पूर्णतः बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यातही हिरवी मिरची वगळता टमाटा व कोथिंबिरीसह इतर भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शितकरी बोलून दाखवत आहेत.

कोरनामुळे मागील वर्ष संकटात गेल्यानंतर मधल्या काळात सर्व काही सुरळीत होत असतानाच संसर्गाने परत एकदा डोके वर काढले. आणि बाजारपेठेतील व्यवहाराबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडल्या गेले आहे. एरवी उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याला चांगला दर मिळत असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टमाटा, कोथिंबीर, दोडके, वांगी, मिरची इत्यादीचे उत्पादन घेतात.

हेही वाचा - नांदेड महापालिका :‘हॉटस्पॉट’ परिसर लपविण्याचा प्रयत्न; बाधितांची संख्या आणखी वाढण्याची भीती

त्यादृष्टीने तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी हिरवी मिरची, टमाटे, वांगे, कोथंबीर, दोडके, फूलगोभी, पानकोबी, इत्यादी फळ भाज्यांची लागवड करुन आवश्यक त्या उपाययोजना करुन या फळभाज्यांची जोपासना केली. याकरता त्यांनी बी- बियाणे व इतर कारणासाठी मोठा खर्चही उचलला. मात्र भाजीपाला तोडणीसाठी आला असतानाच कोरोनामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल व्यवसाय व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडल्या गेले.

ठोक भाजीपाला विक्री करण्याकरिता बीटात आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला उठाव राहिला नाही. परिणामी टमाट्याचा लॉट चाळीस रुपायला पंचवीस किलोचे कॅरेट, कोथिंबीर पाच रुपये किलो, दोडके पंधरा रुपये किलो, फूलगोभी सात रुपये किलो, पान गोबी तीन ते चार रुपये किलो, वांगे 15 ते 20 रुपये किलो, कांदा सहा रुपये किलो असा भाव मिळत आहे. एरवी उन्हाळ्यात 70 ते 80 रुपये किलो जाणाऱ्या हिरव्या मिरचीला 35 ते 40 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडल्या गेले आहे.

उत्पादित केलेल्या भाजीपाल्यांच्या मालाला उठाव नाही व दरही मिळत नाही. त्यामुळे लागवड खर्च तर सोडा सद्यस्थितीत ठोक बाजारात विक्रीसाठी भाजीपाला नेण्यासाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नाही.

- एस. के. निरगुडे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, सांडस.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image