हिंगोली : सेनगाव तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

विठ्ठल देशमुख
Friday, 16 October 2020

सेनगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी, झंडू आदि पिकांना मोठा फटका बसला आहे.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील लिंबाळा येथील तीस वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (ता. १५) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे. 

सेनगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी, झंडू आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या नपीकीला व कर्जबाजारी पणाला कंटाळून सेनगाव तालुक्यातील लिंबाळा (तांडा) येथील रहिवासी बन्सी आडे (वय. ३०) या शेतकऱ्याने गुरूवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. याची माहिती नातेवाईकांना समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी या शेतकऱ्याला जिंतुर तालुक्यातील येलदरी येथे उप आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा नांदेडकरांना दिलासा : कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूदरात घट 

पोलिसांकडून रुग्णालयात जाऊन पंचनामा

मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी जिंतुर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्यावर उपचार सुरु केले. पंरतू या दरम्यान त्यांचा मृत्य झाला. ही माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला. व लिंबाळा येथील एका कुटुंबातला कर्ता-धर्ता गेल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये सुध्दा हळहळ व्यक्त झाली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती जिंतुर पोलिसांना मिळताच तेथील पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.

सततच्या नपीकीमुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल

दरम्यान, शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे व सततच्या नपीकीमुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेची नोंद अद्याप सेनगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती. सेनगाव तालुक्यात यावर्षी झालेल्या पावसाने तसेच नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुरवातीला पावसा अभावी दोन वेळेस पेरण्या कराव्या लागल्या नंतर अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने देखील काढणीस आलेल्या पिकात पाणी जमा झाल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या विवचनेत असलेल्या बन्सी आडे यांनी आत्महत्या केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Debt-ridden farmer commits suicide in Sengaon taluka hingoli news