Hingoli : नुकसान होऊनही अतिवृष्टीपासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Hingoli : नुकसान होऊनही अतिवृष्टीपासून वंचित

कळमनुरी : अतिवृष्टीमध्ये शेतीचे नुकसान झाल्यानंतरही तालुक्यातील वाकोडी सर्कल अंतर्गत १९ गावांमधील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप करत मंगळवारी (ता. १३) शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. यात काठावरील शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. नंतर प्रशासनाकडून पंचनामे करून शासनाकडून मदत मागविण्यात आली होती.

त्यानुसार शासनाकडून अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेले शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पण, वाकोडी सर्कलमध्ये अतिवृष्टी व इसापूर धरणाचे पेनगंगा नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असतानाही प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यामधून वाकोडी सर्कल मधील गावांना वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या बाबत विविध गावांतील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे अतिवृष्टीमध्ये शेतीचे नुकसान होऊनही मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत संबंधितांना जाब विचारला. वेळीच मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा इसापूर धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सखाराम उबाळे, माधवराव सुराशे, राजीव जाधव, श्यामराव फटिंग, रूपेश सोनी, राजेश देशमुख, शिवप्रसाद म्हस्के, मंचकराव इंगळे, दिलीप डोंगरे, राम देशमुख, शिवाजी मस्के, दौलत धनवे यांच्यासह वाकोडी, डोंगरगाव नाका, गंगापूर, गौळ बाजार, तुप्पा, शिवनी बुद्रूक, ढोलक्याची वाडी, कडपदेव, सुकळी, माळेगाव, बाभळी, बेलमंडळ, झरा, खापरखेडा, तरोडा, वाई, नवखा आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.